पीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ

शेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.
The needy should not be deprived of crop loans: Jhirwal
The needy should not be deprived of crop loans: Jhirwal

नाशिक : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीककर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी व उपाययोजना सुचविण्याबाबत सोमवारी (ता. १४) घेण्यात आलेल्या बैठकीत श्री. झिरवाळ बोलत होते. या वेळी आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहंमद आरिफ यांच्यासह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

झिरवाळ म्हणाले, की नवीन शासन निर्णयानुसार लक्ष्यांकानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटप करावे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. या भागात काम करताना सर्व बँकांनी संवेदनशीलता बाळगावी. 

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हातभार लावावा. तसेच या योजनेअंतर्गत येणारा निधी बँकांनी वसुलीपोटी जमा करू नये, अशा सूचना त्यांनी या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व संबंधित बँकांना केल्या. बँकांनी लक्ष्यांकानुसार जास्तीत जास्त पीककर्ज पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. या सर्व बँकांनी कर्जपुरवठा करताना व कर्जाची वसुली करताना आराखडा तयार करावा. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी. कर्जफेड नियमांची स्थानिक भाषेत जनजागृती केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

तूर्तास बॅंकांनी लिलाव करू नये : जिल्हाधिकारी  शेतकऱ्यांना पीककर्ज लवकर मिळावे. तसेच बँकांना येणाऱ्या अडचणींचेही तत्काळ निरसन केले जात आहे. प्रत्येक पंधरा दिवसांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर कर्ज वाटपाचे काम वाढविण्याबाबतच्या सूचना देऊन त्यांचा पाठपुरावा ही करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात वसुली करताना तूर्तास कोणत्याही प्रकारचा लिलाव बॅंकांनी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी उपस्थित बँकप्रतिनिधींना दिल्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com