भारतातून आता निव्वळ  डाळिंब दाण्यांचीही निर्यात 

डाळिंब उत्पादनात अग्रेसर असलेल्या भारतातून दर वर्षी सुमारे ३० हून अधिक देशात डाळिंबाची निर्यात होते. पण आता डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांनाही काही देशातून मागणी वाढत आहे.
Net from India now Export of pomegranate seeds also
Net from India now Export of pomegranate seeds also

सोलापूर ः डाळिंब उत्पादनात अग्रेसर असलेल्या भारतातून दर वर्षी सुमारे ३० हून अधिक देशात डाळिंबाची निर्यात होते. पण आता डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांनाही काही देशातून मागणी वाढत आहे. डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांसाठी ही संधी आहे. प्राथमिक माहितीनुसार यंदा आतापर्यंत सुमारे दोन हजार टन डाळिंब दाण्यांची निर्यात झाली आहे.  देशात जवळपास २ लाख ६१ हजार हेक्टर इतके डाळिंबाचे क्षेत्र आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह दहा राज्यांत डाळिंबाचे उत्पादन होते. त्यात सर्वाधिक दीड लाख हेक्टर इतके क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. इराण, स्पेन, चीन, टर्की हे देश भारताबरोबर डाळिंब उत्पादनात स्पर्धा करतात. पण एकूणच डाळिबाची चव, रंग, आकारमान या सर्व पातळ्यांवर भारताचे डाळिंबाचे भगवे वाण सरस आहे. प्रामुख्याने अरब अमिरातीसह बांगलादेश, कतार, नेदरलॅण्ड, सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, श्रीलंका या देशांसह सुमारे ३० हून अधिक देशांत भारतीय डाळिंबाला पसंती मिळते. जगभरातील एकूण डाळिंब निर्यातीत २२ टक्के वाटा भारताचा आहे. यंदा डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांचीही दोन हजार टनापर्यंत निर्यात झाली आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही निर्यातदारांकडून ही निर्यात झाली आहे. त्या शिवाय सुमारे ६७ हजार ९८० टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. त्यातून ५१६ कोटी ६७ लाखांचे परकीय चलन मिळाले आहे, यावरून निर्यातीतील भारताचा वाटा स्पष्ट होतो.   

दाणे निर्यातीला महत्त्व का?  अलीकडच्या काही वर्षांत डाळिंबावरील तेल्या आणि इतर बुरशीजन्य रोगांमुळे फळांवर डाग पडतात आणि ती फळे फ्रेश मार्केटिंग वा निर्यातीला चालत नाहीत. शिवाय निर्यातीसाठी जाणाऱ्या डाळिंबाच्या रेसिड्यू फ्री (उर्वरित कीडनाशक अंश) तपासणीत सरसकट डाळिंबाची तपासणी होते. वास्तविक, डाळिंबाच्या सालीमध्ये उर्वरकाचे अंश सापडतात, परंतु दाण्यांमध्ये ते नसतात, अर्थात, डाळिंब दाणे रेसिड्यू फ्री असतात. आता थेट डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात होणार असल्याने डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांना चांगली संधी आहे.  दाण्यांना दरही दुप्पट  डाळिंबाला निर्यातीमध्ये किमान प्रति किलो १५० ते २०० रुपयांपर्यंत गुणवत्ता पाहून दर मिळतो. यंदाही जवळपास पावणेदोनशे रुपयांच्या पुढे दर मिळाले. पण निर्यातदारांना डाळिंबाचे दाणे सोलून ते पॅकिंग करून पुढे विक्रीसाठी नेण्यात थोडे श्रम आणि अतिरिक्त वेळ जात असला, तरी तयार दाणे मिळत असल्याने परदेशी बाजारपेठांत मात्र त्याला प्रति किलो सुमारे ४०० रुपयांपर्यंत दरही दुप्पट मिळाला आहे. 

  प्रतिक्रिया डाळिंबाच्या दाण्यांना निर्यातीत चांगली संधी आहे. यंदा आम्ही डाळिंब दाण्यांची निर्यात केली. परदेशी बाजारपेठेत त्याला मोठा उठाव मिळतो आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिकदृष्ट्या त्याचा अतिरिक्त फायदा मिळेल.  -जीव्हीके नायडू, निर्यातदार, हैदराबाद  प्रतिक्रिया  ताज्या डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात हा एक उत्तम पर्याय आहे, ही निर्यात वाढली पाहिजे. निर्यातदार आणि शेतकरी या दोघांसाठीही ही मोठी संधी आहे.  डॅा. नीलेश गायकवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com