नवे कृषी निर्यात धोरण शेतकरीपूरक : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

पुणे ः  कृषी निर्यात धोरण जागरूकता चर्चासत्रात बोलताना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
पुणे ः कृषी निर्यात धोरण जागरूकता चर्चासत्रात बोलताना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

पुणे : देशाचे कृषी निर्यात धोरण ३० वर्षांपूर्वीच येणे गरजेचे होते. मात्र, आम्ही ८ डिसेंबरला धोरण जाहीर करताच १० दिवसांत त्याची अंमलबजावणी सुरू केली. या धोरणाचा शेतकऱ्यांना थेट फायदा देण्यात येणार आहे. जगाला जे हवे आहे, ते देण्याचा प्रयत्न या निर्यात धोरणातून आमचा आहे. कृषी निर्यात धोरण हे शेतकरीपूरक राहणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि निर्यातदारांची भूमिका महत्त्वाची राहील, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे केले. अपेडा आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने वैंकुठ मेहेता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्थेमध्ये शनिवारी (ता. २) आयोजित कृषी निर्यात धोरण जागरूकता चर्चासत्रात केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, अपेडाचे अध्यक्ष पबनकुमार बोरठाकूर, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संतोषकुमार सरंगी, पणन संचालक दीपक तावरे, कृषी आयुक्त सचिंद्रप्रसाद सिंग, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे आदी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना केंद्रीय णिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू ​Video मंत्री प्रभू म्हणाले, ‘‘३० वर्षांपूर्वी ९९ टक्के बेदाणा आयात होत होता. मात्र आता शेतकरी स्वतः बेदाणा निर्मितीमध्ये उतरला असून, आता आपण बेदाणा निर्यात करू लागलो आहे. एकेकाळी गहू, डाळी, तेलबीया आणि आयात करत होतो. मात्र आता मात्र शेतमालाची निर्यात करत आहोत. शेतमालाची निर्यात १०० मिलियन डॉलरपर्यंत वाढविण्यासाठीचे प्रयत्न सरकारचे असून, ज्या देशांमध्ये आपला शेतमाल निर्यात होत नाही अशा विविध देशांमध्ये अधिकाऱ्यांनी भेटी देऊन अभ्यास केला आहे. त्यानुसार आता विविध देशांमध्ये निर्यात सुरू होणार आहे. यासाठी ओमान देश शीतसाखळीसाठी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. निर्यातीसाठी शेतकरी उत्पादन कंपन्यांनी जबाबदारी घेणे गरजेचे असून, शेतमाल निर्यातीतून कृषी क्षेत्र बळकटीतून देशाची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. यासाठी विविध राज्यांची जबाबदारी मोठी असून, मंत्रालयापासून थेट शेतापर्यंत सेवा पोचली पाहिजे.’’ पाशा पटेल म्हणाले, ‘‘शेतमाल निर्यात धोरणामुळे दराअभावी शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नसून, यासाठी १० देशांमध्ये निर्यात करण्यासाठी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार अभ्यास गटाची स्थापना केली आहे. हा गट विविध देशांच्या शेतमालाच्या गरजेचा अभ्यास करून धोरण ठरवून निर्यात करणार आहे. यामुळे आपली निर्यात क्षमता १०० मिलियन डॉलरपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे.  अपेडाचे अध्यक्ष बोरठाकूर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच शेतमाल निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी शेतमालाची क्वॉलिटी, क्लॉंटीटी आणि क्विक ॲक्शनवर भर देण्यात येणार आहे.’’ शेतकरी, निर्यातदारांनी मांडल्या समस्या चर्चासत्रप्रसंगी शेतीमाल निर्यात करताना येणाऱ्या समस्या शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि निर्यातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मांडल्या. यात निर्यात संधी, वाहतूक, पॅकेजिंग, ग्रेडिंग आणि प्रमाणिकरण समस्यांचा समावेश होता. यात योगेश थोरात, अंकुश पडवळे, अशोक गायकवाड, अभिजित भसाळे आदींचा समावेश होता. साखर, दुधावर काम सुरू... साखर आणि दूध उत्पादने निर्यातीसंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले, ‘‘साखर आणि दूध निर्यात आपल्याकडे मोठी समस्या आहे. धरसोडीच्या प्रकारांमुळे या उत्पादनांना न्याय मिळत नव्हता, आता हे होणार नाही. कृषी, बागायती, दूध, मत्स्य उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारास जोडण्यात येणार आहेत. क्लस्टर तयार करण्यात येत आहे.’’       अन्नसुरक्षेची आडकाठी येणार नाही काही विशिष्ट शेतमालाच्या निर्यातीमध्ये अन्नसुरक्षेची आडकाठी येणार नाही. यादृष्टीने धोरण केंद्र सरकार करत असून, जगाच्या पाठीवरील शेतमाल निर्यातीमध्ये भारताचा वाटा वाढविण्यासाठी राज्यनिहाय निर्यात सुविधा केंद्रे उभारण्याची गरज आहे. त्यादृष्टाने केंद्र शासन प्रयत्नशील आहे.  - संतोषकुमार सरंगी, सहसचिव, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com