विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी

मी आज आमदार म्हणून तुमच्याशी बोलत आहे. ही संधी मला महाराष्ट्राने दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. चौदाव्या विधानसभेत अनेक तरुण सदस्य आहेत. योगेश कदम, ऋतुराज पाटील, रोहित पवार, अदिती तटकरे, झिशान सिद्दीकी अशा तरुणांसोबत काम करताना मजा येईल. मी सर्वात आधी मित्रपक्षांचे आभार मानेन. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते ठरवतील, आम्हाला जे काम दिले जाईल ते काम आम्ही करू. - आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेमध्ये बुधवारी (ता. २७) नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. २८८ पैकी २८५ आमदारांनी या वेळी शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला. दरम्यान, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावतीतील वरुड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे दोघे शपथविधीला अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही.

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मंगळवारी श्री. कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली होती. त्यामुळे एकंदरीत २८६ आमदारांचा शपथविधी झाला. १४ व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले होते. बुधवारी सकाळी आठ वाजता भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या शपथविधीने शपथविधीला सुरुवात झाली. ज्येष्ठतेनुसार विधानसभा सदस्यांनी शपथ घेतली. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. या वेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे हे सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शेजारी पुढच्या बाकावर बसले होते. सभागृहात शपथविधीसाठी अजित पवार यांचे नाव पुकारण्यात आले, त्या वेळी आशिष शेलार यांनी ‘या दादा या’ असा आवाज दिला. मात्र, अजित पवार यांनी कोणताही प्रतिसाद न देता मौन पाळणे पसंत केले. विधिमंडळात हा शपथविधी सोहळा सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.  

गेल्या काही दिवसांतील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या शपथविधीकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र विधानभवनातील बुधवारचे वातावरण अत्यंत उत्साही होते. सत्तापेच सुटल्यामुळे नवनिर्वाचित आमदार तणावमुक्त दिसत होते.  युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून अभिनंदन केले. भाजपचे सदस्य संजीव बोधकुँवर यांनी संस्कृतमध्ये, काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीत तर भाजपचे कुमार आयलानी यांनी सिंधी भाषेत शपथ घेतली. या वेळी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शपथ घेतली. 

सर्वपक्षीय नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः विधिमंडळात आल्या होत्या. विधिमंडळात प्रथमच पाऊल ठेवणारे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी स्वागत केले, तर मोठे बंधू अजित पवार यांना मिठी मारत त्यांचे स्वागत केले. गेला महिनाभर आमदारांच्या मनात धाकधूक आणि तणाव होता. तो घालवण्यासाठी आपण स्वतः विधिमंडळात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित पवार यांनी बंडखोरी करत शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे गेले काही दिवस पवार कुटुंबात तणाव होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा देत परत फिरले. तसेच अजित पवार यांनी मंगळवारी रात्री सिल्वर ओक या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. 

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महाविकास आघाडीच्या सरकारला तीन चाकी रिक्षाची उपमा दिली होती. आणि हे सरकार रिक्षाच्या गतीने चालणार, तीन चाकांप्रमाणे यांचीही तीन दिशेला तोंडे असणार अशी टीका केली होती. परंतू, आमचे तीन चाकांचे सरकार हे तुमच्या बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त वेगाने चालणार आहे, असे काॅंग्रेसचे आमदार  सतेज पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com