दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
नव्या परवानगीमुळे मका उत्पादकांचा जीव भांड्यात
राज्यात सर्वाधिक मका खरेदी झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही सुमारे दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक मका पडून आहे. केंद्र शासनाने भरडधान्य खरेदीस मुदतवाढ दिल्याने आता या मक्याच्या खरेदीचा पेच सुटला आहे.
बुलडाणा : राज्यात सर्वाधिक मका खरेदी झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही सुमारे दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक मका पडून आहे. केंद्र शासनाने भरडधान्य खरेदीस मुदतवाढ दिल्याने आता या मक्याच्या खरेदीचा पेच सुटला आहे. राज्याकडून आदेश मिळताच खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
जिल्ह्यात विदर्भात सर्वाधिक मका उत्पादन घेतले जाते. यंदाच्या खरिपात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. जिल्ह्यात मका विक्रीसाठी ११ हजार ३३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी आजवर ३ हजार ७८८ शेतकऱ्यांचा १ लाख ४० हजार ९२४ क्विंटल मका खरेदी झालेला आहे.
खरेदीचा लक्ष्यांक पूर्ण झाल्याचे कारण देत शासनाने मुदतीपूर्वी (३१ डिसेंबर) मका खरेदी थांबविल्याने जिल्ह्यातील राहिलेल्या साडेसात हजारांवर मका उत्पादकांसमोर पेच तयार झाला होता. मका खरेदी सुरू करण्याची मागणी मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी या खात्याच्या मंत्र्यांकडे केली होती.
गेले १० ते १२ दिवस या बाबत कुठलीही घोषणा न झाल्याने अनेकांनी खुल्या बाजारात कमी दरात मक्याची विक्री सुरू केली होती. बाजारभाव व आधारभूत किमतीत शेतकऱ्यांना ७०० रुपयांपर्यंत फटका सहन करावा लागला आहे. शासनाचा बाजारभाव १ हजार ८५० असताना बाजारपेठेत १ हजार १०० रुपयांपासून खरेदी सुरू होती.
जिल्ह्यात सध्या दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक मका शिल्लक असल्याचा अंदाज आहे. नव्या मंजुरीनंतर आता ३१ जानेवारीपर्यंत खरेदीची मुदत राहणार आहे. यामुळे शिल्लक असलेला मका राहिलेल्या १६ ते १७ दिवसांतच खरेदी करावा लागणार आहे.
केंद्राने मंजुरी दिल्याने खरेदीचा मार्ग मोकळा झाला. राज्याचे आदेश जिल्हा यंत्रणेला मिळताच जिल्ह्यात १५ केंद्रांवर तातडीने मका खरेदी सुरू केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मका खरेदीच्या अनुषंगाने सर्वच तयारी आधीपासून झालेली आहे.
- बुलडाण्यातील मका खरेदी
- नोंदणी केलेले शेतकरी - ११३३१
- मका खरेदी झालेले शेतकरी- ३७८८
- शिल्लक शेतकरी- ७५४३
- झालेली मका खरेदी- १४०९२४ (क्विंटल)
- 1 of 1054
- ››