मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय उत्पादनांना चांगली मागणी

प्रमाणित सेंद्रीय उत्पादनांची गरज.
प्रमाणित सेंद्रीय उत्पादनांची गरज.

मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना विशेषतः भाजीपाला आणि फळांना विशिष्ट ग्राहकांमधून चांगली मागणी असल्याचे दिसून येते. याचबरोबरीने देशी गायीचे दूध आणि तुपाची मागणी वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये येत्या काळात सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरणही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

सेंद्रिय उत्पादनांना मुंबई, ठाणे, नवी मुंबईत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, डाळी, गूळ, मसाले, भाजीपाला, फळे, सेंद्रिय शेतीमालापासून बनवलेली प्रक्रिया उत्पादनांना मागणी आहे.   या शहरांच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या भागातील मॉलमध्ये सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. याठिकाणी विविध सेंद्रिय उत्पादने आकर्षक पॅकिंगमध्ये ठेवलेली असतात. तसेच ऑनलाईन सेवांच्या माध्यमातूनही सेंद्रिय उत्पादनांची विक्री केली जाते. राज्यातील काही शेतकरी गट सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून या शहरांमध्ये विक्री व्यवस्था उभी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन सेंद्रिय उत्पादन विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत.

भाजीपाला, फळांना मागणी सेंद्रिय उत्पादनांच्या एकूण बाजारपेठेचा विचार करता सर्वाधिक मागणी भाजीपाला आणि फळांना आहे. गेल्या वर्षभरापासून महानगरांमध्ये काही ठिकाणी आठवडी शेतकरी बाजार भरु लागले आहेत. या बाजारांमध्ये थेट शेतकऱ्यांनी आणलेला ताजा सेंद्रिय भाजीपाला आणि फळे आदी उत्पादने विकली जातात. मात्र, मागणीच्या तुलनेत या शेतीमालाचा पुरवठा मर्यादीत आहे. सेंद्रिय उत्पादनांना दरही किफायतशीर मिळतो. साधारणपणे दीडपट इतकी दरवाढ चांगल्या उत्पादनांना मिळत आहे.

देशी गाईच्या दुधाला मागणी सेंद्रिय शेतमालासोबत देशी गायीच्या दुधालाही शहरांमध्ये मागणी वाढते आहे. मुंबईमध्ये काही खासगी डेअरीतर्फे देशी गाईचे दूध उपलब्ध करून दिले जाते.  दुधासोबतच देशी गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपालाही मागणी दिसते. देशी गायीच्या दुधाला प्रति लिटर ६० ते ८० रुपये मोजायलाही ग्राहक तयार आहेत. फक्त खात्रीशीर दुधाची गरज आहे. तुपालाही प्रति किलो दीड ते दोन हजार रुपये इतका दर मिळतो. दुधाच्या बाबतीत मर्यादीत पुरवठ्याची समस्या आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा अत्यल्प आहे.

प्रमाणित उत्पादनांची गरज अलीकडे शहरी ग्राहकांमध्ये सेंद्रिय शेतमालाच्या बाबतीत जागरुकता आली आहे. त्यामुळे आर्थिक कुवत असलेल्या ग्राहकांचा सेंद्रिय उत्पादनांकडे कल वाढताना दिसतो. मात्र, सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण, दर्जा, विश्वासार्हता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. यावरून ग्राहकांमध्ये काहीशी साशंकता दिसून येते. सेंद्रिय उत्पादनांच्या नावाखाली फसवणूक होईल ही भीती ग्राहकांमध्ये असते. यावर्षी राज्य शासनाने राज्यात रसायन अवशेषमुक्त शेती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे राज्यभरात शेतकरी गट, कंपन्या स्थापन करून त्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी यावर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणीकरण झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com