पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश टिकैत

शेतीच्या भवितव्याचा विचार तरुण शेतकरीच करीत आहेत. पुढील लढाई ही तरुणांना लढावी लागणार आहे. या आंदोलनात तरुणही सक्रिय आहेत.
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश टिकैत
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश टिकैत

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले, त्यास आज (ता. २६) एक वर्ष पूर्ण होत आहे. या आंदोलनाने देशाला शेतकरी एकजूट दाखवली, सरकारला वाकायला लावणारी शक्ती दाखवली. या आंदोलनाचे गाझीपूर सीमेवर यशस्वी नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्याशी आमचे प्रतिनिधी संतोष शाळिग्राम यांनी केलेली बातचीत... प्रश्‍न : वर्षभर आंदोलन केल्यानंतर तीन कृषी कायदे रद्द झाले. या आंदोलनाने शेतकऱ्यांना नेमके काय दिले? श्री. टिकैत : शेतीविरोधी भूमिका घेऊन सरकारने कायदे केले होते. त्याला आमचा विरोध होता. हे कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा लढाईचा एक टप्पा आहे. या आंदोलनामुळे देशाला आणि सरकारला शेतकरी एकजुटीची प्रचिती आली. शांततामय मार्गाने शेतकऱ्यांनी आंदोलन केले आणि मागण्या मान्य करून घेतल्या. ही या आंदोलनाची मोठी उपलब्धी आहे. देशातील शेतकऱ्यांना संघटितपणे लढा देण्यासाठी हे आंदोलन प्रेरणा देत राहील. हे आंदोलन शेतकऱ्यांचे आहे, तसेच गावखेड्याच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या समस्या मांडणारे आहे. शेतीमाल आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेची ही लढाई आहे.  प्रश्‍न : आंदोलन मोडून काढण्याचाही प्रयत्न झाला... श्री. टिकैत : हो. अनेक प्रकारे आंदोलन मोडण्याचे प्रयत्न झाले. हे आंदोलन चार राज्यांपुरते मर्यादित आहे, असा प्रचार केला गेला. आंदोलकांवर शेलक्या भाषेत टीका झाली. आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. सामान्य नागरिक आणि शेतकरी यांच्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. सरकारकडून चर्चा बंद झाली. मात्र आंदोलक ठाम होते. त्यांचा आत्मविश्‍वास ढळला नाही. म्हणून आंदोलन सुरू राहिले आणि सरकारला कायदे रद्द करण्याची घोषणाही करावी लागली. प्रश्‍न : आतातर आंदोलन राजकीय झाल्याची टीकाही केली जातेय... श्री. टिकैत : आमचे आंदोलन हे अराजकीयच‌ आहे. आम्ही कधीही कोणावरही राजकीय टीका केली नाही. ज्यांना पंतप्रधान राहायचे, त्यांनी राहावे. पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशीच माझी भूमिका राहिली आहे. हेही मी माध्यमांमधून, सभांमधूनही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलन राजकीय होत असल्याची टीकादेखील आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच आहे. आम्ही केवळ शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडतोय. ते सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. ते ती पूर्ण करीत नाहीत म्हणून आम्हाला सरकारच्या विरोधात बोलावे लागत आहे. याचा अर्थ आंदोलन राजकीय झाले असा होत नाही. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. आम्ही सरकारी व्यवस्थांच्या विरोधात बोलत आहोत.

प्रश्‍न : महापंचायतीसारख्या शेतकऱ्यांच्या मंचावरून भाजपला थेट आव्हान का दिलं जातंय?| श्री. टिकैत : सत्तेत बसलेला पक्ष कोणता आहे? त्यांना आव्हान द्यायचं नाही तर कुणाला? सत्तेच्या तख्ताला अस्थिर करीत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची औपचारिकता देखील सरकार दाखवत नाही. म्हणून ही टीका थेट पक्षावर वाटत असेल; पण आमचा पक्षीय राजकारणाशी संबंध नाही. हे सरकार मात्र शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहे. पंतप्रधानांनी तीन कृषी कायदे मागे घेतले, त्या वेळी काही शेतकऱ्यांना आम्हाला समजावता आले नाही, असे विधान त्यांनी केले. याचा अर्थ काय होतो? शेतकरी हिताच्या निर्णयापेक्षा यांना शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यात धन्यता वाटते आहे. प्रश्‍न : तरुण शेतकरी या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहतो आहे का? श्री. टिकैत : शेतीच्या भवितव्याचा विचार तरुण शेतकरीच करीत आहेत. पुढील काळात हे लोक शांत राहिले, तर कृषी उत्पन्न बाजार समित्या या खासगी बाजार होतील. अनेक तरुणांचे रोजगारही हिरावले जातील. गावातल्या जमिनी खासगी कंपन्यांना बहाल केल्या जातील. शेतकरी अडचणीत आहेच. त्याला आणखी किती अडचणीत राहू देणार आहात. त्यामुळे पुढील लढाई ही तरुणांनाही लढावी लागणार आहे. या आंदोलनात तरुणही सक्रिय आहेत. महापंचायतींमध्ये देखील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. प्रश्‍न : किमान आधारभूत किंमत हमी कायदा व्यवहार्य नाही, असा प्रचार केला जातोय... श्री. टिकैत : नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते या कायद्याची वकिली करीत होते. आता ते ‘न्यायाधीश’ झाले आहेत. ते केंद्रात सत्तेत नव्हते, ‌त्या वेळी हा कायदे करणे योग्य होते. पण आता ते सत्तेत आले, तर हा कायदा करणे चुकीचे कसे ठरते. पुढील काळात मूर्ख लोकांकरवी यासंबंधी गैरसमज पसरविले जातील. त्यांना पद्मश्री देऊन त्यांच्याकडून चुकीचे वदवून घेतले जाईल. त्यावर चर्चा रंगविल्या जातील आणि संसद, विरोधी पक्ष, संसद सदस्य यांचा वेळ वाया घालविला जाईल. एमएसपी हमीचा‌ कायदा हा शेतकरी हिताचा आहे, तो झालाच पाहिजे. यासंबंधी पसरविल्या जाणाऱ्या गैरसमजावर शेतकरी आणि विरोधी पक्षांनी देखील विश्‍वास ठेवू नये. प्रश्‍न : कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. पुढे काय? श्री. टिकैत : आम्ही आता सरकारबरोबर चर्चा करू. त्यात एमएसपी हमी कायद्याचा विषय असेल, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांची अटक, आंदोलन काळात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा विषय असेल. शेतीसंबंधी सरकार काही कायदे आणू पाहत आहे, त्यावरही सरकारने आमच्याशी चर्चा केली पाहिजे. आमची लढाई ही शेती आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आहे. कॉर्पोरेट कंपन्यांची तरफदारी करून त्यांच्या हितासाठी धोरणे आखली जाणार असतील, तर सरकार कुणाचेही असो, त्याला आमचा विरोधच असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com