‘एनएचबी’ अधिकऱ्यांनी शेतकऱ्यांना पाच तास तिष्ठत ठेवले

 ‘एनएचबी’ अधिकऱ्यांनी शेतकऱ्यांना पाच तास तिष्ठत ठेवले
‘एनएचबी’ अधिकऱ्यांनी शेतकऱ्यांना पाच तास तिष्ठत ठेवले

पुणे : सातबारा कोरा नाही म्हणून अनुदान नाकारणाऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अर्थात ‘एनएचबी’च्या अधिकाऱ्यांनी पाच तास शेतकरी शिष्टमंडळाला तिष्टत ठेवले. यानंतर तुम्ही पुण्याच्या ऑफिसला उगीच आलात त्याऐवजी दिल्लीला पत्रव्यवहार करा, असे सांगून शेतकऱ्यांना पिटाळून लावले.   दलाल व एजंटांचा पक्का विळखा असलेली एनएचबीने राज्यातील शेकडो शेतकऱ्यांचे अनुदान प्रस्ताव विचित्र कारणे देत रद्द केलेले आहेत. एनएचबीच्या अनुदान ‘प्रकल्प मान्यता समिती’ (पीएसी) मार्फत ‘शेती तारण असल्यास अनुदान नाकारा’, असा विचित्र फतवा काढण्यात आला आहे. या फतव्यामुळे एनएचबीच्या सर्व विभागीय कार्यालयांनी प्रस्ताव नाकारल्यामुळे कर्जबाजारी शेतकरी हबकले आहेत.   शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी (ता. २९) सकाळी दहा वाजेपासून पुण्याच्या एनएचबीकडे धाव घेतली. या वेळी एनएचबीत दिल्लीहून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. बैठक थांबवून शेतकऱ्यांची आस्थेने चर्चा करणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत थांबवून ठेवले.  अधिकाऱ्यांना भूक लागल्यानंतर काही अधिकारी सभागृहातच जेवण करू लागले, तर पाच तासांपासून तहानभूक विसरून उभ्या असलेल्या शेतकऱ्यांशी उभ्याउभ्याच एक अधिकारी ''बोला... तुमचे काय म्हणणे आहे,'' असे विचारल्यावर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.  शेतकरी विजयकुमार भीमराया भरमगोंडे म्हणाले, "मी एनएचबीच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या सर्व त्रुटी दाखविल्या, तसेच इतर शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. मात्र, अधिकाऱ्यांनी आम्हाला पुन्हा दिल्ली ऑफिसला संपर्क साधण्यास सांगितले. आमच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. वरून आदेश येतात तसे आम्हाला काम करावे लागते. आम्ही वरिष्ठांच्या आदेश मोडू शकत नाही. तुम्ही तुमचे अर्ज एनएचबीच्या एमडी ऑफिसला दिल्ली गुडगावच्या ऑफिसला पाठवा." कोल्हापूर, सोलापूर, सांगली भागांतील शेतकऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. याच शेतकऱ्यांनी एक आठवड्यापूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. निवडणुका संपताच दिल्लीत मी स्वतः या विषयावर बैठक लावण्यास भाग पाडतो, असे आश्‍वासन श्री. पवार यांनी दिले आहे.  चित्रीकरण डिलीट करण्यास भाग पाडले शेतकऱ्यांना टोलावण्याचा प्रकार एनएचबीच्या ऑफिसमध्ये सुरू असताना काही शेतकरी मोबाईलमध्ये चित्रीकरण करून घेत होते. एनएचबीच्या छाननी समितीमधील बॅंक ऑफ महाराष्ट्रमधील एक अधिकारी हे पाहात होता. "तुम्ही शेतकरी आहात. असे उद्योग कशाला करता? फोटो-व्हिडिओ काढून काय होणार आहे? आधी ते डिलीट करा,’’ असे या अधिकाऱ्याने फर्मावले. भांबावलेल्या शेतकऱ्याने या अधिकाऱ्याला मोबाईल दाखवत त्याच्यासमोरच व्हिडिओ क्लिप डिलीट केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com