निफाड पुन्हा गारठले

निफाड पुन्हा गारठले
निफाड पुन्हा गारठले

पुणे: उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह आल्याने राज्याच्या किमान तापमान घट झाली आहे. शनिवारी (ता. १४) निफाड येथे नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने गारठा चांगलाच वाढला. सकाळी तापमान कमी झाले असले, तरी दुपारी उन्हाचा चटका वाढत असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत कायम आहे. पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. १६) विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.     पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहत असल्याने राज्याच्या कमाल तापमानात घट झाली. पश्‍चिमी चक्रावात ओसरताच राज्याच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. तर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह आल्याने निफाडसह नाशिक आणि पुण्याच्या तापमानातही घट झाल्याचे दिसून आले. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मात्र किमान तापमान १७ अंशांच्या पुढे आहे. राज्याच्या कमाल तापमानातही वाढ होत असून, सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.  गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरडे हवामान आहे. उत्तर छत्तीसगडपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाचा पुरवठ्यामुळे पूर्व भारतातील राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. उद्यापासून (ता. १६) विदर्भ मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मंगळवारी (ता. १७) विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.३ (१२.९), नगर ३४ (१६), धुळे ३१ (१३.२), जळगाव ३१.७ (१५), कोल्हापूर ३३.१ (१८.७), महाबळेश्‍वर २८.४ (१७), मालेगाव ३३.२ (१४.८), नाशिक २९.९ (११.६), निफाड २९.१ (७.४), सांगली ३४ (१९.१), सातारा ३४.१ (१५.१), सोलापूर ३६ (२१.५), अलिबाग २८ (१७.६), डहाणू २८.४ (१९.१), सांताक्रूझ ३०.१(१६.६), रत्नागिरी २९.८ (१९.२), औरंगाबाद ३२ (१७), परभणी ३५ (१९), नांदेड ३५ (२२), अकोला ३४.५ (१८), अमरावती ३४.४ (१९.४), बुलडाणा ३०.८ (१७.६), चंद्रपूर ३३.५ (१९), गोंदिया ३०.६ (१४.६), नागपूर ३३.३ (२०.७), वर्धा ३४.५ (२१.८). ---

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com