दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश संरक्षण पुरस्कार
कोकण कन्याळ या शेळी जातीच्या संवर्धनासाठी निळेली पशुधन संशोधन केंद्रास (ता.सावंतवाडी)वंश संरक्षण पुरस्कार-२०२० ने सन्मानित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या संवर्धनासाठी निळेली पशुधन संशोधन केंद्रास (ता.सावंतवाडी)वंश संरक्षण पुरस्कार-२०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो करनाल (हरियाना) या संस्थेमार्फत हा देण्यात आला.
डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ दापोलीतर्गंत कार्यरत असलेल्या सावंतवाडी येथील निळेली पशुधन संशोधन केंद्रामध्ये २०१० मध्ये सर्वप्रथम कोकणकन्याळ या शेळीच्या संशोधित जातीची नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून समान गुणधर्माच्या व उत्तम दर्जाच्या शेळ्या एकत्र करून त्यांचे निळेली येथील केंद्रावर संवर्धन करण्याचे काम सुरू झाले. त्यामध्ये योग्य त्या सुधारणा केल्यानंतर त्यांच्या प्रसारासाठी विविध कृषी विज्ञान केंद्र तसेच प्रगतशील शेतकऱ्यांना पुरविण्यात आल्या.
कोकण कन्याळ शेळीची वाढती मागणी विचारात घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला व उपलब्ध निधीतून निळेली, वाकवली आणि दापोली या तीन ठिकाणी कोकण कन्याळ शेळी पैदास केंद्रे सुरू केली. तसेच कोकणातील विविध कृषी विज्ञान केंद्रावर प्रात्यक्षिक संच तयार करण्यात आले. गेल्या पाच-सहा वर्षांत विद्यापीठाने सुमारे २००० हून अधिक कोकण कन्याळ जातीच्या शेळ्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
शेळी संवर्धनाबरोबरच शेळीचे दूध वाढ, मटणाची प्रत सुधारणा, गोठा कसा असावा, यासाठी काही संशोधन शिफारशी देखील विद्यापीठाने प्रसारित केल्या आहेत. यासर्व बाबींचा विचार करून हा पुरस्कार या केंद्राला देण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रस्ताव सादरीकरणासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. बाळकृष्ण देसाई तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ बळवंत सावंत यांनी मार्गदर्शन केले.
प्रतिक्रिया...
निळेली संशोधन केंद्रावर सुमारे १४८ शेळ्यांचा कळप असून, भविष्यामध्ये या शेळी वंशाच्या संवर्धनासाठी कोकण कन्याळ शेळी संघ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या शेळी संशोधन प्रकल्पासाठी डॉ. विष्णू कविटकर, डॉ समीर शिरसाट यांनी विशेष मेहनत घेतली.
- डॉ. अशोककुमार चव्हाण, प्रभारी अधिकारी, निळेली,
पशुधन संशोधन केंद्र, ता. सावंतवाडी
- 1 of 1054
- ››