महापुराचे जलतांडव सुरूच

पूर
पूर

पुणे : जोरदार पावसाने कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापुरात जलतांडव पाहायला मिळत आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थितीने भीषण स्वरूप धारण केले असून अन्न, पाणी, इंधन, वीजपुरठा ठप्प झाल्याने नागरिकांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळमधील येथे बचावकार्य करताना बोट उलटून १६ जण वाहून गेले असून, त्यापैकी नऊ जणांचे मृतदेह सापडले आहेत. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील परिस्थिती पूर्वपदावर येत असून, सोलापूर जिल्ह्यातली पंढरपूर आणि अकलूज येथे मात्र चंद्रभागा आणि नीरा नद्यांच्या पाण्याचे रौद्ररूप गुरुवारीही कायम होते.   कोल्हापूर जिल्ह्याला असलेला पुराचा विळखा कायम असून, नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्न, वीज आणि इंधनही मिळत नाही. त्यामुळे मोठा संघर्ष करावा लागत आहे. जिल्ह्यातील पुराची पातळी वाढतच असल्याने नागकरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ८) पूरस्थितीची हवाई पाहणी करून कोल्हपुरात पूरग्रस्तांची भेट घेऊन सर्व मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.  सांगली जिल्ह्यातील मिरज येथे कृष्णेच्या महापुरात लाखो रुपये किमतीची जनावरे वाहून गेली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जनावरांनी पाण्यात प्राण सोडले. नदीकाठी काहींनी पाणी वाढत असल्याचे पाहून दावी रिकामी केली. त्यातील काही जनावरे हाताला लागली, तर उर्वरित नदीच्या आहारी गेली. कृष्णाघाटावर प्राथमिक शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर सत्तरहून अधिक जनावरे बांधण्यात आली आहेत.  पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात असलेल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून, जवळपास १९ धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वीर धरणातून सर्वाधिक ७० हजार २४९ क्सुसेकने विसर्ग होत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने धरणातील पाण्याचा सुरू असलेला ४५ हजार ४७४ क्सुसेकवरून कमी करून तो ३९ हजार ६११ क्युसेक करण्यात आला. पावसाचे दोन महिने उलटले तरीही पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यात अजूनही दमदार पाऊस नाही. धरणाच्या पुराच्या पाण्याने दोन्ही बाजूंनी शहराला वेढले आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूरसह माळशिरस, मंगळवेढा तालुक्यांत निर्माण झालेली पूरस्थिती विसर्ग कमी झाल्यानंतर काही प्रमाणात ओसरली. मात्र पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठच्या गावात तसेच माळशिरस, मंगळवेढा तालुक्यांत पूरस्थिती कायम होती. भीमा नदीच्या पूररेषेत येणाऱ्या तालुक्यातील ४८ गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण त्यापैकी २९ गावांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गोदावरीला आलेल्या पुरामुळे जायकवाडी प्रकल्पात सतत अकरा दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती. या आवकेमुळे आधी मृतसाठ्यात असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २१८३.६०५ दलघमी जाऊन पोहोचला आहे. तर प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा १४४५.४९९ दलघमी झाला. प्रकल्पातील पाणीसाठा ६६.५८ टक्के झाल्याची माहिती प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाने दिली. कोयना धरण क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. उजनी धरणातून विसर्ग कमी करून १ लाख ३० क्युसेकवर आणण्यात आला आहे. तसेच दौंडकडून उजनीत येणारा विसर्गही ८४००० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. उजनी धरणाची पाणीपातळी सध्या १०२ टक्क्यांवर स्थिर आहे.  ब्रह्मनाळमध्ये १६ जण वाहून गेले. पलुस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना हलविताना ३२ जणांना घेऊन जाणारी बोट उलटून १६ जण वाहून गेले. यातील ९ जणांचे मृतदेह सापडले असून, ७ जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, एक लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर येथे पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी ब्रह्मनाळ येथील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली.  दुर्घटनेतील मृतांची नावे अशी  कल्पना रवींद्र कारंडे  कस्तुरी बाळासाहेब वडेर  पप्पू भाऊसाहेब पाटील  लक्ष्मी जयपाल वडेर  राजामती जयपाल चौगुले  बाबासाहेब अण्णासो पाटील  तसेच एक लहान मुलाचा मृतदेह मिळाला आहे त्याचे नाव समजू शकले नाही.  बेपत्ता व्यक्तीचे नाव  पिल्लू तानाजी गडदे 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com