नगरमध्ये तुरीचे हेक्टरी नऊ क्विंटल उत्पादन

नगर जिल्ह्यात यंदा तुरीचे सरासरी हेक्टरी नऊ क्विंटलचे उत्पादन निघाले आहे. कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगातून केलेल्या पाहणीत हा अंदाज व्यक्त केला आहे.
Nine quintals of turi production in the town
Nine quintals of turi production in the town

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा तुरीचे सरासरी हेक्टरी नऊ क्विंटलचे उत्पादन निघाले आहे. कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगातून केलेल्या पाहणीत हा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी हेक्टरी ४ क्विंटल ४९३ किलोचे प्रतिहेक्टरी उत्पादन निघाले होते. यंदा तुरीचे उत्पादन चांगले निघाले असले तरी अजूनही खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात तुरीचे सरासरी १५ हजार १२१ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा मात्र सरासरीच्या ३३६ टक्के म्हणजे ५५ हजार ५३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक कर्जत तालुक्यात १४ हजार ६६० हेक्टर, जामखेड तालुक्यात ११ हजार ३४४ हेक्टर, शेवगाव तालुक्यात ८७१२, पाथर्डी तालुक्यात ८३५४, पारनेर तालुक्यात २३३७ हेक्टर, नगर तालुक्यात ३५३४ हेक्टरवर तुरीचे पीक घेतले.

यंदा चांगला पाऊस झाल्याने तुरीचे पीक जोमात आहे. त्यामुळे उत्पादनही चांगले झाले आहे. कृषी भागाने प्रत्येक महसुली गावांत पीक कापणी प्रयोग घेतले आहे. त्यातून हाती आलेल्या उत्पादनानुसार प्रतिहेक्टरी सरासरी ९ क्विंटलचे उत्पादन निघाले आहे. सर्वाधिक कर्जत तालुक्यात हेक्टरी १४ क्विंटल तर राहुरीत हेक्टरी बारा क्विंटल उत्पादन निघाले आहे.

पाथर्डी तालुक्यात हेक्टरी उत्पादनाची सरासरी ६ क्विंटलपर्यंत आहे. कापसाने यंदा नुकसान झाले असले तरी काही भागात शेतकऱ्यांना तुरीने तारले आहे. गेल्यावर्षी नेमके शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने ताणले होते. त्यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसला. गेल्यावर्षी कृषी विभागाच्या अंदाजानुसार ४ क्विंटल ४९३ किलोचे प्रतिहेक्टरी उत्पादन निघाले होते.

विक्रीचा प्रश्न तयार होणार? नगर जिल्ह्यात यंदा तुरीचे चांगले पीक निघाले आहे. तूर बाजारात येताच दर पाडले आहेत. सरकारी हमी दरानुसार प्रति क्विंटलला ६ हजार रुपये क्विंटल दर मिळणे गरजेचे असताना सध्या पाच हजारापर्यंत प्रतिक्विंटलला बाजारात दर मिळत आहे. उत्पादनाबाबत कृषी विभागाने काढलेल्या अंदाजानुसार नगर जिल्ह्यात यंदा सरासरी साडेचार लाख क्विंटलपर्यंत तुरीचे उत्‍पादन निघणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी सरासरी तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन असून सरकारी खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी नोंदणी सुरू केली आहे. मात्र, खरेदी केंद्रे कधी सुरू होणार हे अजूनही निश्चित नाही. त्यामुळे दोन वर्षापूर्वीप्रमाणेच यंदा तूर विक्रीचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com