नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
केंद्रेवाडीत नऊ हजार पक्षी मारणार
लातूर : केंद्रेवाडी परिसरातील सुमारे नऊ हजार कोंबड्या मारल्या जाणार आहेत. ते कामही पशुसंवर्धन विभागाने सुरु केले आहे.
लातूर : केंद्रेवाडी (ता. अहमदपूर) व सुकणी येथील कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’मुळेच मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर आता प्रशासनाने हा संसर्ग पुढे इतर पक्षांना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्रेवाडी परिसरातील सुमारे नऊ हजार कोंबड्या मारल्या जाणार आहेत. ते कामही पशुसंवर्धन विभागाने सुरु केले आहे.
या संसर्गामुळे जिल्ह्यातील कुक्कटपालकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. देशभरात काही राज्यात ‘बर्ड फ्लू’ची लागण झाली आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे देखील या संसर्गाच्या विळख्यात आले आहेत.
लातूर जिल्हा देखील त्याला अपवाद राहिला नाही. गेल्या आठवड्यात केंद्रेवाडी (ता. अहमदपूर) येथे २५० कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुकणी (ता. उदगीर) येथे देखील काही कोंबड्या दगावल्या. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या मृत कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आले. त्याचा अहवाल प्रशासनाला आला आहे.
‘बर्ड फ्लू’मुळेच या कोंबड्या मृत झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या संदर्भात एक आदेश काढला. केंद्रेवाडी व सुकणी या बाधित क्षेत्रास केंद्रबिंदू धरून एक किलोमीटर त्रिज्येचे संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
या क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्षी, उर्वरित पक्षीखाद्य, अंडी नष्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जलद प्रतिसाद दलाच्या मार्फत शास्त्रोक्त पद्धतीने संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रभावित पक्षांना मारण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोना पाठोपाठ आलेल्या या ‘बर्ड फ्लू’च्या संकटामुळे कुक्कटपालकांचे कंबरडे मोडणार आहे.
केंद्रेवाडी परिसरातील आठ ते नऊ हजार कोंबड्या मारण्याची कारवाई सुरू आहे. औशात एका बगळ्याचा मृत्यू झाला. त्याचाही अहवाल प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री फार्मधारकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- नानासाहेब कदम, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, लातूर.
- 1 of 1028
- ››