निवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’

निवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’
निवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’

नाशिक  : त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाच्या निमिताने दरवर्षी पौष एकादशीला राज्यभरातून वारकरी दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी त्र्यंबकनगरीतील वारी ही स्वच्छतेमुळे खऱ्या अर्थाने ‘निर्मलवारी’ ठरली. यात्रेदरम्यान परिसर स्वच्छतापूर्ण असावा, रस्त्यावर कुठेही मानवी मैला पडू नये व येणाऱ्या वारकऱ्यांना प्रसाधनगृहांची व्यवस्था व्हावी, तसेच यात्रापश्‍चातदेखील स्वच्छता राहावी यासाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून ‘निर्मलवारी’ या संकल्पनेच्या आधारे स्वच्छतेचा जागर करण्यात आला.  गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्र्यंबकेश्‍वर येथे उपलब्ध केलेल्या फिरत्या शौचालयांचा वापर आलेल्या वारकऱ्यांनी करावा, यासाठी निर्मलवारीच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. जवळपास २० विविध ठिकाणी निर्मलवारीच्या ४०० स्वयंसेवकांच्या माध्यमातून वारकऱ्यांचे स्वच्छता गृह वापरासंबंधी प्रबोधन करण्यात आले. १९ ते २१ जानेवारीदरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच, या वेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित मुंजे इन्स्टिट्यूट व मविप्र संचालित के.टी.एच.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत, शिक्षण, शेतकरी आत्महत्या यांसारख्या विषयांवर सुमारे ५०० वारकऱ्यांशी संवाद साधत सर्वेक्षणदेखील करण्यात आले.  वारीआधी पत्राने, तर २ दिवस आधी सर्वांना लघुसंदेश आणि प्रत्यक्ष फोन करून केलेल्या आवाहनामुळे उत्तम प्रतिसाद मिळाला असे वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष भरत केळकर यांनी सांगितले.  ‘घरकुल’च्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेचा संदेश नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर मार्गावार पिंपळगाव बहुला या ठिकाणी असलेल्या घरकुल या संस्थेच्या विद्यार्थिनींनीदेखील या वेळी निर्मलवारीत सक्रिय सहभाग नोंदविला. मानसिक अपंग असलेल्या विशेष विद्यार्थिनींसाठी घरकुल संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जाते. या विद्यार्थिनींनी हाती फलक घेत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छता व शौचालय वापरासंबंधी प्रबोधन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com