निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका

पुणे: निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. काही ठिकाणी आंबे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
Nisaraga cyclone hits Pune district
Nisaraga cyclone hits Pune district

पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे रस्ते बंद झाले असून, वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी आंबे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. 

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून भिज पाऊस पडत आहे. त्यामुळे काढणीला आलेली बाजरी व भुईमूग या पिकांना मोठा फटका बसला आहे. घोडेगाव परिसरातील नारोडी, गिरवली, चास, चिंचोली, कोळवाडी, शिंदेवाडी, पूर्वेकडील निरगुडसर आदी २० गावांत पावसामुळे काढणीला आलेली बाजरी जमीनदोस्त झाली. 

इंदापूर तालुक्यातील बोरी, वडापुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुमारे शंभर एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केली आहे. मका व कडवळ पिके खाली पडल्याचे वडापुरी, भिगवण, काटी, रेडा ,रेडणी अवसरी, बाभूळगाव व परिसरात पहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातही पावसाची संततधार सुरू आहे. काढणीला आलेले बाजरी,आंबे,मका पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्याने भात खाचरे तुडुंब झाली आहेत. कडबा, सरमाड, मक्याचे नुकसान झाले. मगळवार ते बुधवारपर्यंत ४० मि.मी. पाऊस झाला. 

आंब्याच्या झाडांवरील फळांची गळ झाली आहे. वादळाच्या भीतीने नागरिक घरांमध्ये आहेत. वेगवान वाऱ्यामुळे नुकसान होण्याच्या धास्तीने पोल्ट्रीशेड, पॉलिहाऊस शेडनेट मालकांनी जीव मुठीत धरून रात्र जागून काढली. पाळू गावातील पांडुरंग नारायण गायकवाड यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून नुकसान झाले. शिरूर तालुक्यात कोरेगाव भीमा, शिरूरच्या पश्चिम पट्ट्यासह पूर्वहवेलीत जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी काही पिकांसह लहान झाडांचे किरकोळ नुकसान झाले. 

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, खेड शिवापूर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत व पुणे शहर व उपनगरात वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल झाला. वाऱ्यामुळे अनेक गावांत गावरान आंबा पिकांचे नुकसान झाले. जुन्नर तालुक्यात सर्वत्र पाऊस होत आहे. तालुक्यातील नऊ मंडल विभागातील पर्जन्य मापन केंद्रावर एकूण १२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे कांदा भिजू नये म्हणून शेतकरी वर्गाची लगबग सुरु आहे. 

भोर तालुक्यात चक्रीवादळाचा तडाका बसण्यास सुरुवात झाली. बुधवारी सकाळी काही ठिकाणी झाडे पडली. मंगळवारी रात्रभर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. भाटघर धरणाजवळ महावितरणच्या लाईनवर झाड पडल्यामुळे भोर शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी तुटलेल्या तारा जोडण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत. नसरापूर व परिसरात काल संध्याकाळपासूनच पावसाची सुरवात झाली.  पुरंदरमध्ये फळपिकांना फटका 

पुरंदर तालुक्यात माळशिरस परिसरात अधूनमधून पाऊस येत आहे. या भागात जोरात वारे वाहत असून, संततधार पाऊसही आहे. पाऊस पेरणी योग्य झाल्याने शेतकरी सुखावला असला, तरी सिताफळ, डाळिंब, पेरू या फळपिकांना फटका बसला. या फळभागांचे फळ व फुल गळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे.  

बहुतांश भागात संततधार 

 गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हयातील पश्चिम पट्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता.२) दिवसभर पश्चिम पट्यासह, पुणे शहर आणि पूर्वेकडील काही भागात पावसाची संततधार चालू होती. वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ५० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्हयातील बहुतांशी तालुक्यातील कमी अधिक पाऊस पडला. बुधवारीही अशीच काहीशी स्थिती कायम होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com