‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमान

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडला.
cyclone
cyclone

पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडला. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रुप धारण केले. किनारपट्टीलगत वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढल्याने झाडे उन्मळून, मोडून पडली. जमिनीवर येताच या वादळाचा वेग कमी होण्यास सुरुवात झाली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगतची गावे, सखल भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.  महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मंगळवारी (ता.२) दुपारी चक्रीवादळाची निर्मिती झाली. बुधवारी (ता.३) पहाटेपासून वादळाची तीव्रता आणखी वाढली. ही वादळी प्रणाली वेगाने महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे झेपावत असल्याने सकाळपासूनच समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या. कोकणासह घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला सुरवात झाली. रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यावरून मध्यप्रदेशकडे जाणार आहे. दरम्यान, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातही वादळाचा प्रभाव जाणवू लागला आहे.  वादळ जमिनीकडे येताच वादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. दुपारी साडे तीन वाजता वादळाचे केंद्र अलिबागच्या दक्षिण भागात होते तर मुंबईपासून ७५ किलोमीटर अंतरावर अग्नेय दिशेला, पुण्यापासून पश्चिमेला ६५ किलोमीटर अंतरावर वादळ घोंगावत होते. या कमी दाब क्षेत्राचे केंद्र ताशी २० किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकू लागले आहे. रात्री उशिरापर्यंत वादळाची तीव्रता कमी होण्याचे संकेत होते. या वादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यात ताशी १०० ते ११० किलोमीटर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी ९० किलोमीटर वेगाने, तर गुजरातच्या वलसाड, नवासरी येथे ८० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. महाराष्ट्र, गुजरात, गोवा किनाऱ्यालगत समुद्रात १ ते २ मीटर उंच लाट उसळत होत्या. तर वादळामुळे रायगडसह कोकणात घराची पडझड होऊन, छपरे उडून गेली. नारळाची झाडे मोडून पडली. तर इतर झाडे उन्मळून पडली. जोरदार वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.  गेल्या ७२ वर्षामध्ये प्रथमच ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणारे तीव्र चक्रीवादळ मुंबईला धडकले असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर वादळामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीवर नियंत्रणासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी नौदल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यात २० पथके आपत्तीनिवारणासाठी काम करत असून, यापैकी पाच पथके विशाखापट्टणम येथून आणण्यात आली आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. बृहन्मुंबई महापालिकेने भायखळा येथील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.   कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार वारे, पाऊस पडत आहे. आज (ता.४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर रायगडमध्ये जोरदार पाऊस पडत असून, आज (ता.४) नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

वादळामुळे नुकसान

  • मुंबई, रायगडसह कोकणाला तडाखा 
  • नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातही प्रभाव वाढला
  • कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग वाढला
  • उंच लाटा, जोरदार वारे, झाडे उन्मळून पडली
  • वीजेचे खांब वाकले, घरांची पडझड, छपरे उडाली.
  • किनारपट्टीवरील हजारो लोकांचे स्थलांतर 
  •  प्रशासन, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न
  • पिकांना मोठा फटका

  • भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान 
  • रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारी, आंब्याची झाडे उन्मळून पडली
  • द्राक्ष, डाळींब, केळी, पपईसह फळबागा झोपल्या 
  • कांदा, ऊस, मक्यासह उभ्या पिकांचे नुकसान
  • पोल्ट्री शेड, पॉलीहाऊस, कांदा चाळी, पशुधानाच्या गोठ्यांची पडझड, पत्रे उडाली
  • शाळा, अंगणवाड्या, घराचे पत्रे आणि छपरे उडून गेली  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com