nisarga destroyed in Pune district
nisarga destroyed in Pune district

पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान

पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३) दुपारपासून जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातले. सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसाने शेती, पोल्‍ट्री, फळबागा, घरे, गोठे यांचे मोठे नुकसान झाले.

पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३) दुपारपासून जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातले. सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसाने शेती, पोल्‍ट्री, फळबागा, घरे, गोठे यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने वाहतुकी बरोबरच वीज पुरवठा खंडीत झाला. तो सुरळीत करण्याचे काम वीज वितरण कंपनी आणि प्रशासनाकडून सुरु होते. 

जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर, मावळ, मुळशी, भोर वेल्हा, पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती आदी तालुक्यांना वादळाचा फटका बसला आहे. जुन्नर तालुक्यात बुधवारी दुपारी तीन ते पाच दरम्यान चक्री वादळाने पिके व मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटर असल्याची नोंद खोडद येथील दुर्बीण प्रकल्पाच्या (जीएमआरटी) वेदर स्टेशनच्या आलेखावरून स्पष्ट झाली. वाऱ्याच्या वेगामुळेच नुकसानीची तीव्रता वाढल्याचे जीएमआरटीचे वरिष्ठ अधिकारी जे. के. सोळंकी आणि आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. 

वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील सर्व फळभाजीपाला पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. जनावरांचे गोठे, शेततळी, पत्रा छत असलेली घरे, व्यावसायिक दुकाने आदींचे मोठे नुकसान झाले. होतातोंडाशी आलेले आंबा, डाळिंब, केळी, टोमॅटो, सीताफळ या फळभाजीपाला पिकांचे भरून न येणारे नुकसान झाले. कलमी फळांची झाडे उन्मळून पडली. द्राक्ष वेली तुटल्याने मागील वर्षभरात द्राक्ष उत्पादकांना दुसऱ्यांदा फटका बसला. तालुक्यात सुमारे दोनशे विजेचे पोल पडून वीजपुरवठा खंडित झाला. वीज वितरण कंपनीने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. 

शिरुर आणि शिक्रापूर परिसरात शेतीचे मोठे नुकसान झाले. यात प्रामुख्याने ऊस जमीनदोस्त झाल्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच झाडांची पडझड झाली. वाजेवाडी, करंदी, केंदूर, मुखई, हिवरे-पिंपळे, जातेगाव खुर्द, जातेगाव बुद्रुक आदी गावांतील ऊस भुईसपाट झाला.  गावरान हापूसचे मोठे नुकसान

जिल्हात जुन्नर,खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यातील पश्चिम घाच परिसरात मोठ्याप्रमाणावर हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते. कोकण हापूसचा हंगाम संपल्यावर जिल्ह्यातील गावरान हापूसचा हंगाम सुरु होतो. मात्र ऐन काढणीला आलेला हापूस वादळी पावसाने झडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्नर आंबेगाव तालुक्यातील हापूस हा जुन्नर हापूस नावाने विक्री बरोबरच आखाती देशांमध्ये निर्यात होते. हा हापूस प्रामुख्याने जुन्नर तालुक्यातील काले, येणेरे, सुराळे, धालेवाडी, बेलसर, वडज, शिंदे राळेगण, माणिकडोह, या ठिकाणी उत्पादन घेतले जाते.  शिरूरमध्ये पॉलिहाउस कोसळली 

शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठे नुकसान झाले. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. पॉलिहाउस कोसळले. विजेचे सुमारे ७० खांब कोसळल्याने पुरवठा खंडित झाला. जांबूत येथून जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद पडली. सोसायटीचे माजी आध्यक्ष सुभाष जगताप यांनी या परिसरातील झाडे जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला. येथील १२ ते १३ शेतकऱ्यांची पॉलिहाउस कोसळली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामा करून भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.  खेड तालुक्यात दुपारनंतर निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. तुफानी वादळी वाऱ्यांनी ठिकठिकाणी झाडे पडली आणि अनेक ठिकाणी शेडचे आणि कच्च्या घरांचे, खोल्यांचे पत्रे उडाले.

ठिकठिकाणी विजेचे खांब पडले. वादळाच्या रुद्रावताराने जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. वहागाव (ता.खेड) येथे घर पडून बुधवारी महिलेचा, तर गुरूवारी (ता.४) सकाळी दवाखान्यात असणाऱ्या तिच्या मुलाचा मृत्यू झाला. याशिवाय घर, फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले. वादळामुळे साठवण केलेल्या कांदाही मातीमोल झाला. चाकण औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना मोठा फटका बसला. शिवे येथे जवळपास ४० घरांचे नुकसान झाले. २०० नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य उपकेंद्राच्या आवारात हलविल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी दिली. 

वाकीतर्फे वाडा येथील विश्वास शिवेकर यांच्या गुलाबाच्या फुलांच्या पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले. शिंदे गावातील ठाकरवस्ती येथील विद्युत जनित्र पडले आहे. गुरांचे गोठे, पत्रा शेडचे नुकसान झाले. गोनवडी येथे साखर कारखान्याचे संचालक दिनेश मोहिते पाटील यांच्या दीड एकरमधील कारले पीक भुईसपाट झाले.  पन्नास गावे अंधारत 

वांद्रा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. वीजवाहक खांबांचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जवळपास तीनशे ते चारशे वीजवाहक खांब कोसळले. वराळे येथे विजेचे तीन खांब वाकले असून झाडेही पडली आहेत. तर चाकण व परिसरातील गावातील आठ विद्युत खांब पडले. तसेच औद्योगिक वसाहतीतील उच्च दाबाच्या मुख्य वाहिनीचे पंचवीस व इतर सतरा खांब पडल्याने चाकण व परिसरातील पन्नास गावातील, तसेच औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा बुधवारी (ता.३) बंद होता. औद्योगिक वसाहतीतील तसेच चाकण शहराचा वीजपुरवठा गुरूवारी सुरळीत झाला. इतर गावातील वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत नव्वद टक्के सुरू होईल, अशी माहिती वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राहुल ढेरे यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com