महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा प्राधान्याने मूलभूत विकास

निती आयोगाची ‘महत्त्वाकांक्षी जिल्ह्यां’ची क्रमवारी जाहीर; देशात १०१ जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्रातील उस्मानाबाद, वाशीम, गडचिराेली आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांचा समावेश अत्याधुनिक आणि ऑनलाॅइन पद्धतीने विकासकामांचे नियंत्रण; योजनांची अंमलबजावणी
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा प्राधान्याने मूलभूत विकास
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा प्राधान्याने मूलभूत विकास

नवी दिल्ली : पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी आणि जलसंधारण, कौशल्य विकास, आरोग्य, आर्थिक समावेशन आदी क्षेत्र निकषांवर ‘महत्त्वाकांक्षी जिल्हे’ म्हणून देशातील १०१ जिल्ह्यांची निवड निती आयोगाने नुकतीच जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील उस्मानाबाद, वाशीम, गडचिराेली आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.   दरम्यान, निती आयोगाच्या या उपक्रमाचा दैनंदिन कामाचा आढावा घेतला जाणार आहे. आज (ता.१) पासून यासंबंधित ४९ निकषांसंदर्भातील ‘डेटा एंट्री’ सुरू होत आहे, तर मे महिन्यापासून याअाधारे जिल्ह्यांच्या प्रगतीची क्रमवारी ठरणार आहे. या सर्व माहिती संकल्पावर निती आयोगाचे नियंत्रण असणार असून, ही माहिती सार्वजनिक उपलब्ध असणार आहे. निती अायोग आणि आंध्र प्रदेश सरकारने मिळून या उपक्रमासाठीचा ‘डॅशबोर्ड’ तयार केला आहे.   देशातील अप्रगत जिल्ह्यात स्पर्धेचे वातावरण निर्माण करून विकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर मागास असलेल्या १०१ जिल्ह्यांची निवड ‘महत्त्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण’ या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. जानेवारी २०१७ मध्ये या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना, ‘‘देशात विविध निकषांवर मागास असलेल्या १०० जिल्ह्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारली तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल,’’ असे म्हटले होते. या अनुषंगाने निती आयोगाने ‘ट्रान्सफॉर्मिंग ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टस’ हा उपक्रम सुरू केला. मानव विकास निर्देशांक उंचविण्यासाठी मूलभूत सुविधा-योजनांची एकात्मिक अंमलबजावणी या जिल्ह्यात होणार आहे.  

अभिसरण, सहयोग व स्पर्धा या धाेरणाअंतर्गत देशभरातून जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे अभिसरण व या योजनांच्या अंमलबजावणीत प्रभारी अधिकारी;तसेच जिल्हाधिकारी यांचा सहयोग आणि या योजना अंमलबजावणीचे रूपांतर स्पर्धात्मक व लोक चळवळीत करणे या धोरणातून महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी २८ राज्यांतील ११५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. ही निवड करताना आर्थिक समावेशन, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा हे निकष ठरविण्यात आले होते.

शैक्षणिक निकषांवर महाराष्ट्राची प्रगती निती आयोगाने विविध आठ शैक्षणिक निकषांवर देशातील जिल्ह्याचे मूल्यमापन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या टॉप २० जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्हा शैक्षणिक प्रगतीत दुसऱ्या स्थानावर आहे. गडचिरोली जिल्हा तिसऱ्या, तर वाशीम पाचव्या स्थानावर आहे.

कृषी क्षेत्रात उस्मानाबाद चौथ्या स्थानावर उस्मानाबाद हा जिल्हा कृषी क्षेत्रातील विविध निकषांवर देशातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यातील यादीतील टॉप २० जिल्ह्यांत चौथ्या स्थानावर राहिला आहे. कृषी क्षेत्रांतील कार्याचे मोजमाप हे विविध १० निकषांवर करण्यात आले. यामध्ये गुणवत्तापूर्ण बियाणे वाटप, माती आरोग्य कार्ड, जनावरांचे लसीकरण, पीक विमा, बाजार उपलब्धता आदी निकषांचा समावेश होता.

उस्मानाबाद तिसऱ्या क्रमांकावर निती आयोगाच्या महत्त्वाकांक्षी १०१ जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. यात उस्मानाबाद तिसऱ्या, वाशीम ११ व्या, गडचिरोली १४ व्या तर नंदुरबार ३९ व्या स्थानावर आहे. क्रमांक एकला आंध्र प्रदेशातील विजयानगरम या जिल्ह्याचा समावेश असून, सर्वांत शेवटी हरियानातील मेवत हा जिल्हा आहे.   या क्षेत्रांचा प्राधान्याने विकास... १) आरोग्य आणि पौष्टिकमूल्य २) शिक्षण ३) कृषी, संलग्न क्षेत्र आणि जलस्राेत ४) अर्थ विकास ५) कौशल्य विकास ६) मूलभूत सुविधा विकासकामांचा ‘डॅश बोर्ड’ महत्त्वाकांक्षी जिल्हा विकासासाठी ऑनलाइन पद्धतीने कामाचे मूल्यमापन आणि आढावा घेतला जाणार आहे. याकरिता ४९ निकष निश्‍चित करण्यात आले असून, ८९ मुद्यांवर डेटा एंट्री केली जाणार आहे. बरोबर एक महिन्यानंतर मे महिन्यात या सर्व १०१ जिल्ह्यांतील विकासकामांच्या आधारे आघाडी घेणाऱ्या आणि पिछाडीवरील जिल्ह्यांची माहिती ‘डॅश बोर्ड’वर दिसण्यास प्रारंभ होणार आहे. या १०१ जिल्ह्यांतील ‘बदलाचे चँपियन’ यातून समोर येणार आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com