सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास गडकरींचा नकार

राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका चांगले काम करीत आहेत. त्यामुळे सहकाराच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा बॅंकांना हटविणे योग्य ठरणार नाही. मात्र, अडचणीत आलेल्या बॅंकांचे विलीनीकरण व्हायला हवे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे.
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास गडकरींचा नकार
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास गडकरींचा नकार

पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका चांगले काम करीत आहेत. त्यामुळे सहकाराच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा बॅंकांना हटविणे योग्य ठरणार नाही. मात्र, अडचणीत आलेल्या बॅंकांचे विलीनीकरण व्हायला हवे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंका गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेस व राष्ट्रवादीची कॉंग्रेसची सत्ताकेंद्रे समजली जातात. त्यामुळे सहकारी पातळीवर कोणतीही भूमिका घेताना भाजपकडून जिल्हा बॅंकांना सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत असतो. आता श्री.गडकरी यांनी उघडपणे जिल्हा बॅंकांचे समर्थन केले आहे. राज्य सहकारी बॅंक तसेच नागरी सहकारी बॅंकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून गुरूवारी (ता.२८) संवाद साधला. यावेळी त्रिस्तरीय रचनेचा मुद्दा निघाला असता सर्वांचे कान टवकारले होते.

केस टू केस जावे लागेल “शिखर बॅंक, जिल्हा बॅंक आणि विविध कार्यकारी सोसायट्या अशा तीन संस्थात्मक कामकाजावर ही रचना उभी आहे. इतर पाच राज्यांमध्ये जिल्हा बॅंकांची रचना काढून टाकली गेली आहे. केवळ शिखर बॅंक व सोसायट्या अशी द्विस्तरीय रचना तयार होण्याबाबतचा सरकारची भूमिका काय राहील, असा मुद्दा मांडला गेला असता श्री.गडकरी यांनी जिल्हा बॅंकांना पाठिंबा दिला,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

“माझा या विषयात अभ्यास नाही. त्यामुळे मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही. मात्र चांगले काम करणाऱ्या जिल्हा बॅंकांना विनाकारण नसताना विलीन करू नये. बुलडाणा, वर्धा अशा जिल्हा बॅंकांना मदतीची गरज आहे. त्यांच्या बाबत विलीनीकरणाचा पर्याय आहे. मात्र, या धोरणाबाबत सरसकट न जाता ‘केस टू केस’ ठरवावे लागेल,” अशी भूमिका श्री.गडकरी यांनी मांडली.

पुणे जिल्हा बॅंकेचे काम उत्तम “माझ्या मते अधिकाराचे विक्रेंद्रीकरण कधीही चांगले असते. शक्यतो केंद्रीकरण करू नये. कारण, राज्यात काही जिल्हा बॅंका चांगल्या पद्धतीने कामे करताना दिसत आहेत. आता पुणे जिल्हा बॅंकेचेच उदाहरण घ्या ना. ती बॅंक चांगले काम करीत असताना तिला कशा ‘मर्ज’ करता. इतर बॅंका ‘मर्ज’ करण्यास हरकत नाही,” अशी भूमिका श्री.गडकरी यांनी मांडली.

‘एकमेकांचे हात धरून पुढे जायला हवे’ राज्यातील जिल्हा सहकारी किंवा नागरी बॅंकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर मदत करण्याची तयारी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी दाखवली. “बॅंकांनी आपल्या समस्या, बदलत्या कामकाज, नवे उद्योग किंवा योजना याबाबत अभ्यासात्मक माहिती तयार करावी. शरद पवार साहेबांकडे सादरीकरण करावे. तसेच, राज्य सरकारमधील अजित पवार, सुभाष देसाई, जयंत पाटील यांना सोबत घ्यावे. मी स्वतः तुमच्याबरोबर केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे येईल. आपल्याला राज्याच्या सहकारी, कृषी व ग्रामविकासाला चालना देणाऱ्या नव्या दिशा शोधाव्या लागतील. त्यासाठी आपण एकमेकांचे हात धरून पुढे जायला हवे,” अशी भूमिका श्री.गडकरी यांनी मांडली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com