महाराष्ट्र निश्‍चितच दुष्काळमुक्त होईल ः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

देशाची लोकसंख्या १२५ कोटी असून, सर्व महामार्गांच्या दुतर्फा तेवढेच वृक्ष लावण्याचा आपला संकल्प आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

नागपूर  ः महाराष्ट्राच्या दृष्टीने रस्ते आणि सिंचन ही खाती महत्त्वाची आहेत. मागील पाच वर्षांत १७० ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यात आले आहेत. नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. त्यातून निघालेली माती, मुरूम, दगड रस्त्यांच्या बांधकामात वापरले. २६ प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजना, तर १०८ बंधारे बळिराजा योजनेंतर्गत मंजूर केले आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होणार असल्याने महाराष्ट्र निश्‍चितच दुष्काळमुक्त होईल, असा विश्‍वास केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी यांचे शनिवारी (ता. १) प्रथमच नागपूर शहरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर भक्ती बंगल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी श्री. गडकरी म्हणाले की, लघुउद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असते. देशाच्या विकासदरातही याचा मोठा वाटा असतो. याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योग खात्याची जबाबदारी सोपविली आहे. आपल्याही आवडीचे हे खाते असून, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीचा आपला प्रयत्न राहणार आहे. ते म्हणाले की, लघुउद्योग खात्यात खादी ग्रामोद्योग, हॅंडलूम, स्टार्टअप, स्टॅंडअपसह सर्व छोट्या-मोठ्या उद्योगांचा समावेश होतो. ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगारनिर्मिती करण्याचे आपण आधीच ठरविले होते. त्यात संबंधित खातेही मिळाले आहे. सध्या खादीच्या कपड्यांची मोठी क्रेझ आहे. त्यास देशविदेशातही मागणी आहे.

शेवग्याच्या शेंगाची पावडर तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मिक्‍सर उपलब्ध करून दिले आहेत. कोरियाकडून २५० टन पावडरची ऑर्डर दृष्टिक्षेपात आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. पुढील वर्षी या खात्याचे ऑडिट करा, तुम्हाला निश्‍चितच फरक दिसेल, असेही श्री. गडकरी म्हणाले. 

मुंबई ते दिल्ली द्रुतमार्गाच्या ६० टक्के कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. २०२२ पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हा महामार्ग जगातील सर्वांत मोठा ठरणार असल्याचे या वेळी श्री. गडकरी यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com