साखरेऐवजी इथेनॉलवर भर द्याः नितीन गडकरी

नितीन गडकरी
नितीन गडकरी

सातारा ः पाणी आले म्हणून ऊस लावत बसू नका, उसापासून साखरेऐवजी इथेनॉलनिर्मितीवर भर द्यावा. हे इथेनॉल विकत घेण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करण्याकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.  दरम्यान, छत्रपतींच्या शुभेच्छा व जिल्ह्यातील जनतेचे आशीर्वाद मिळाले तर आम्ही सर्व कामे वेळेत मार्गी लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने रविवारी (ता. २३) जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या दहा हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन आणि धोम बलकवडीच्या मुख्य कालव्याचे लोकार्पण कार्यक्रमात मंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरिश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा माधवी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शेखर चरेगावकर, अतुल भोसले, नितीन बानुगडे पाटील, नरेंद्र पाटील, महामार्ग प्राधिकरणाचे डी. ओ. तावडे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल आदी उपस्थित होते.  मंत्री गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात पाच लाख कोटींची कामे मंजूर झाली असून ही सर्व कामे उत्तम दर्जाची व भ्रष्टाचार मुक्त आहेत. त्यामुळे एकही ठेकेदार मला भेटण्यासाठी आलेला नाही. मुख्यमंत्री आणि मी ठरविले आहे की महाराष्ट्रातील ५० टक्के जमीन सिंचनाखाली आणायची. त्यासाठी जुन्या व अपूर्ण प्रकल्पांना प्रधानमंत्री आणि बळिराजा कृषी सिंचन योजनेतून ५६० कोटी रक्कम दिली आहे. उर्वरित दोन हजार कोटी नाबार्डचे कर्ज मंजूर करून दिले आहे. आता पाणी येणार आहे म्हणून ऊस लावत बसू नका. पीक पद्धतीत बदल करा. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात रस्त्याचे जाळे आगामी तीन वर्षांत पूर्ण होईल. गेली २० वर्षे ज्या कामांसाठी आंदोलने झाली त्या सर्व कामांबाबत आम्ही निर्णय घेतले. पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात सिंचन प्रकल्पांची कामे हाती घेतली आहे. आता आम्ही सत्तेवर आलोय त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही विकासकामे सुरू आहेत. आता हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांमुळे राज्यात २०१९ मध्ये ५० टक्के क्षेत्र सिंचनाखाली येईल. सार्वजनिक उपसा सिंचना योजना अनेकवेळा थकीत वीजबिलामुळे अडचणीत येतात. यासाठी उपसा सिंचन योजना सोलरवर टाकणार आहोत. यातून सरकार व शेतकऱ्यांचे पैसे वाचणार आहेत. जिल्ह्यातील विविध सिंचन योजना आम्ही हाती घेतल्या आहेत त्यातून दुष्काळी भाग राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 या वेळी गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, विजय शिवतारे, डी. ओ. तावडे यांची भाषणे झाली.  कांदा व गाजर फेक आंदोलन  कांद्याचे पडलेले दर आणि राज्य सरकारकडून ऊसदराबाबत झालेले दुर्लक्ष यावरून संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काॅँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कांदे फेकून आंदोलन केले. तर जिल्हा परिषदेच्या चौकात गाजर वाटप आंदोलन करण्यात आले. आंदोलन होणार हे ओळखून ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरण्याचे ठिकाणही पोलिसांनी बदलले.  नवीन कारखान्याला परवानगी नको सुभाष देशमुखसाहेब आता तुम्ही कोणत्याही नवीन साखर कारखान्यांना परवानगी देऊ नका. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सारखेचे दर १९ रुपये आहेत. आमच्याकडे साखर अनुदान मागायला येऊ नका. पाणी आणले म्हणून ऊस लावाल आणि छातीवर बसून भाव मागाल. यासाठी राजू शेट्टी आंदोलन करतील. पण आमची आता ताकद राहिलेली नाही. इथेनॉलनिर्मिती केली तरच साखर उद्योग टिकेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com