येत्या पावसाळ्यात ‘एल निनो’ची भीती नाही : हवामान विभाग

येत्या पावसाळ्यात ‘एल निनो’ची भीती नाही
येत्या पावसाळ्यात ‘एल निनो’ची भीती नाही

पुणे : येत्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल निनो) हा अडथळा राहणार नाही, अशी दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती हवामान खात्याने गुरुवारी येथे दिली आहे. या वर्षी राज्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे डिसेंबरअखेरपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत ‘एल निनो’ विकसित झालेला नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो’ हा अडथळा असणार नाही. याच्या प्रगतीवर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. त्यामुळे त्याचा विकास कसा होतोय, यावर आमचे लक्ष आहे.’’ या वर्षी थंडीचा कडाका वाढला आहे, याबद्दल बोलताना डॉ. राजीवन म्हणाले, ‘‘या वर्षी संपूर्ण जगात थंडीची तीव्रता वाढली आहे. पृथ्वीच्या ध्रुवांवरही मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. भारतात हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टी होत आहे. तसेच, युरोपमध्येही यंदा बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ प्रमाणही या वर्षी वाढले आहे. पण, यातून भारतातील सपाट मैदानात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली या प्रदेशात तेथील सरासरीच्या तुलनेत आत्ता कमी प्रमाणात पाऊस नोंदला गेला आहे. पण, त्या जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश या भागात हिमवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा हिमवृष्टी जास्त होत आहे.’’ निसर्ग समतोल साधतो... जागतिक वातावरणातील बदलांमुळे हिवाळा कमी होत असल्याच्या जोरदार चर्चा सर्वत्र होतात. पण, निसर्ग समतोल साधत असल्याचे यंदाच्या थंडीने स्पष्टपणे दाखवून दिले आहे. या निसर्गाचे संवर्धन आपण केले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. राजीवन यांनी व्यक्त केली.

उत्तरेकडून थंडीची लाट आहे. तेथून दक्षिणेच्या दिशेने थंड आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही भागात दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदले गेले आहे. पुढील चार ते पाच दिवस ही थंडी कायम राहील, असा अंदाज आहे. - डॉ. के. एल. रमेश, महासंचालक,  भारतीय हवामान विभाग  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com