जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय खरेदी केंद्रांना सूचना
कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. केंद्रातील दलाली, कटती व हमाली तोलाईपोटी होणारी अवाजवी वसुली याचे सीसीआय समर्थन करीत नाही : मुख्य महाव्यवस्थापक एस.के.पाणिग्रही
जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. केंद्रातील दलाली, कटती व हमाली तोलाईपोटी होणारी अवाजवी वसुली याचे सीसीआय समर्थन करीत नाही. कटती व हमालीपोटी जी वसुली, कपात होते, ती कारखानदार व शेतकरी यांच्या संमतीनेच होते. परंतु याबाबत कुणाची तक्रार असेल तर त्यांनी समोर यावे. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा प्रशासनासह आमच्याकडेही याबाबत तक्रार करता येईल. खरेदी केंद्रात दर्जेदार कापूस खरेदीचे निर्देश आहेत. खरेदी केंद्रात जो कापूस खरेदी केला जातो, त्यास हमीभावानुसार दर द्या व कटती करू नका, असे स्पष्ट निर्देश खरेदी केंद्रात दिले आहेत, असे स्पष्टीकरण सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के.पाणिग्रही यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिले.
‘ॲग्रोवन’ने जळगाव जिल्ह्यात सीसीआयच्या खरेदी केंद्रातील कटतीसंबंधी मुख्य पृष्ठावर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखलही सीसीआयने घेतली आहे. यानंतर कटती, हमीभाव व खरेदी केला जाणारा कापूस याबाबत जे निर्देश केंद्रांना यापूर्वी दिले आहेत, ते व्यवस्थितपणे पाळले जावेत. शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये. अवाजवी वसुलीचे सीसीआय समर्थन करीत नाही. शेतकऱ्यांना सहकार्य करा, असे पुन्हा एकदा बजावले आहे, असेही पाणिग्रही म्हणाले.
कवडी कापसामुळे तडजोड
पाणिग्रही म्हणाले, की काही प्रकरणात शेतकरी किंवा कापूस पुरवठादार यांचा काही प्रमाणातील कापूस कवडीयुक्त असतो. त्याचे वजन अत्यल्प असते. हा कापूस सीसीआय खरेदी करीत नाही. सीसीआयने खरेदी केंद्रात एक क्विंटल कापसात किती रुई व सरकी हवी, याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. कवडीयुक्त कापसात कापूस किंवा रुई येत नाही. तो फेकावा लागतो. हा कापूस केंद्रात नाकारला जातो. दर्जेदार कापसाचीच खरेदी करायची आहे. शासनाचे नुकसान व्हायला नको. कारण शासनही लोकांचेच आहे.
कवडीयुक्त कापसाच्या मुद्यात अनेक वेळा पुरवठादार खरेदीची विनंती करतो. मग हा कापूस १० किलो असला तर त्यापेक्षा कमी कटती काही प्रकरणात लावली गेल्याचे प्रकार घडू शकतात. पण अशा प्रकरणात शेतकरी, कारखानदार यांची सहमती असते. सरसकट सर्वांसाठी कटती लावणे चुकीचेच आहे. तसे व्हायलाही नको. परंतु ज्यांची कारण नसताना कटती लावली असेल. पिळवणूक, नुकसान केले असेल, ते शेतकरी तक्रार करू शकतात. ही तक्रार बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा प्रशासन व आमच्याकडेही करता येईल.
याबाबत संबंधित योग्य ती कारवाई करतील. शेतकरी सीसीआयच्या कामाचा बिंदू आहे. त्याच्यासाठीच आम्ही काम करतो. त्याचे नुकसान कधीच मान्य केले जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांचा कापूस निकषानुसार किंवा दर्जेदार आहे. त्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. कटतीचा मुद्दा अशा वेळी यायला नको, असेही पाणिग्रही म्हणाले.
हमाली, तोलाईबाबत बाजार समित्यांनी लक्ष घालावे
सीसीआय खरेदी केंद्रातील हमाली, तोलाईसंबंधीच्या वसुलीबाबत कारवाई करू शकत नाही. ही वसुली केंद्रात बाजार समिती कायद्यानुसार करायची आहे. परंतु काही वेळेस अवाजवी वसुली केली जात असेल. याबाबत शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, असेही पाणिग्रही म्हणाले.
- 1 of 653
- ››