दूध खरेदीदरात वाढ नाही; संघांची भूमिका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जात असलेल्या दुधाच्या दरात तूर्त वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रतिलिटर २८ रुपये हाच दर यापुढेही राहणार आहे. 

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बुधवारी (ता. २५) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नामांकित खासगी व सहकारी दूध संघांचे ४० प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक सप्टेंबरपासून प्रतिलिटर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २८ रुपये दर देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. कल्याणकारी संघाने या दराचा बुधवारी पुन्हा आढावा घेतला. खरेदी दरात तूर्त कोणताही बदल करू नये, अशी मागणी या वेळी पुढे आली व सर्वानुमते बदल न करण्याचे ठरले. शेतकऱ्यांचे दर वाढवून देताना ग्राहकांवर कोणताही बोजा न टाकण्याचे ठरले. यामुळे दुधाच्या कमाल किरकोळ विक्री दरात (एमआरपी) कोणतीही वाढ केली जाणार नाही.

संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले, की दर दहा-बारा दिवसाला दूध खरेदी दर कमी केल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडते. त्यासाठी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी परवडणारा दर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही पाऊच विक्री दर मात्र दोन रुपयांनी वाढविला आहे. मात्र, ग्राहकांवर याचा बोजा टाकला जाणार नाही. एमआरपी ते डीलर रेट यातील ‘गॅप’ कमी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. गेल्या आठवड्यात पाऊच विक्री करणाऱ्या चार डेअरी प्रकल्पांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. त्याचेही पडसाद बैठकीत उमटले. डेअरीचालकांनी एमआरपी ते डीलर रेट यातील फरक मर्यादित ठेवण्याची गरज आहे. पाऊच विक्री करणाऱ्या प्रकल्पांनी पुढील काळात सावध राहून नियोजन करावे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com