वरूडमध्ये ‘कोरोना’मुळे बागांतील द्राक्षांना कोणी विचारेना

पाच एकरपैकी अडीच एकर द्राक्षे ऑक्टोबरमधील अतिवृष्टीने डाऊनी, कुज येऊन संपली. दीड एकरात उत्पादित ३०० क्विंटल द्राक्ष ‘लॉकडाऊन’मध्ये अडकले. त्याचे पैसे अजून व्यापाऱ्याकडून मिळालेले नाहीत. एक एकर येणे बाकी आहे. पण, झालेला ७ लाख खर्च यंदा वसूल होणार नाही. - गणेश म्हस्के,द्राक्ष उत्पादक, वरुड अवकाळी पावसाने तोडणी पुढे ढकलली. त्यामुळे माझ्या २ एकर द्राक्ष बागेतील माल पुढच्या हंगामाच्या नियोजनासाठी तोडून टाकला. चार लाख खर्च झाला. तो यंदा वसूल होणार नाही. - नामदेव म्हस्के,द्राक्ष उत्पादक, वरुड.
No one would ask the grapes because of the 'corona' in Varud
No one would ask the grapes because of the 'corona' in Varud

जालना : जवळपास दीडशे एकरवर विस्तारलेल्या वरुडच्या द्राक्षांना यंदा अवकळा आली आहे. आधी नैसर्गिक आपत्तीने निम्म्या बागा गेल्या. आता उरलेल्या बागांमधील ४० टक्के बागा काढणीला आल्या. अन् ‘कोरोना’च्या संकटाने या बागांना कुणी विचारेना. त्यामुळे लाखोंचा खर्च करून उत्पादित केलेल्या द्राक्षांचे करायचे काय, हा प्रश्न वरुडच्या द्राक्ष उत्पादकांना पडला आहे. 

यासंदर्भात वरुड येथील द्राक्ष उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुड शिवारात जवळपास दीडशे एकरावर द्राक्षाचे क्षेत्र आहे. जवळपास निम्म्या क्षेत्रावरील द्राक्ष बागायतदारांनी यंदाच्या हंगामासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष बागांची छाटणी केली होती. या बागा १८ ऑक्टोबच्या अवकाळी पावसाच्या संकटात सापडल्या. जवळपास ७ नोव्हेंबरपर्यंत हा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष बागांमध्ये डाऊनी व कूज वाढून निम्म्या बागा संपल्या. द्राक्ष बागांना वाचविण्यासाठी जवळपास दोन महिने शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. ते निष्फळ ठरले. त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. 

दरम्यान, ऑक्टोबरच्या शेवटी छाटणी केलेल्या बागांमधील द्राक्ष मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रीसाठी तयार झाले. मात्र, त्यानंतर आलेल्या ‘कोरोना’च्या संकटामुळे या द्राक्ष बागांकडे कुणी फिरकेना. ज्या व्यापाऱ्यांनी द्राक्ष बागांचे सौदे केले होते, त्यांनी ठरलेल्या दरात बागा घेण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली. अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात द्राक्ष विकण्याची तयारी ठेवली, तर काहींना पुढच्या हंगामाचे नियोजन होण्यासाठी वेळेत द्राक्ष बागा रिकाम्या करण्यासाठी व्यापाऱ्यांना द्राक्ष तोडून न्या, तुमच्या सोयीने दर द्या, अशी तयारी ठेवण्याची वेळ आली. 

यंदा वरुड येथील द्राक्ष उत्पादकांचा झालेला खर्च वसूल होण्याची शक्यता नाही. वरुड शिवारातील जवळपास दहा टक्के बागा एप्रिलच्या मध्यानंतर येणार असल्याची माहिती वरूडच्या द्राक्ष उत्पादकांनी दिली. 

विमा परताव्याचा प्रश्न कायम 

नैसर्गिक आपत्तीत निम्म्या बागा गेल्या. परंतु, त्याचा विमा परतावा शेतकऱ्यांना अजून मिळाला नाही. विमा उतरविण्यासाठी तत्परता दाखविणारे परतावा देण्यात तत्परता दाखवत नाहीत. दुसरीकडे विमा परतावा मिळण्यासाठीच्या किचकट अटी आमचे नुकसान करीत असल्याचे द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com