सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही 

केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या पामतेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर फारसा परिणाम होणार नाही.
soybean
soybean

पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या पामतेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. झाला तरी तो कमी काळासाठी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता टप्प्याटप्प्याने विकावे. तसेच आंतरराष्ट्रीय मूलभूत घटकांचा विचार करता सोयाबीन भाव खाणार आहे, अशी माहिती शेतमाल बाजार विश्‍लेषक, सोयाबीन प्रक्रियादार आणि व्यापारी सूत्रांनी दिली. 

देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे दर सप्टेंबर महिन्यापासून वाढत होते. बहुतेक तेलाचे दर हे लिटरमागे १५ ते ३० रुपयांनी वाढले होते. त्यातच खरिपात तेलबिया उत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यावर आणखी दबाव निर्माण झाला. त्यामुळे केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क कपात करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त पसरले होते. त्यानुसार सरकारने गुरुवारी कच्च्या पामतेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात करून ३७.५ वरून २७.५ टक्के केले आहे. त्याचा परिणाम पामतेलाच्या दरावर झाला असून दरात लिटरमागे ५ रुपयांपर्यंत घट झाली आहे. 

मध्य प्रदेशातील सोयाबीन व्यापारी राघव झावर म्हणाले, की केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मध्य प्रदेशातील सोयाबीन बाजारावर कुठलाही परिणाम झाला नाही. दर आजही तेजीतच आहेत. 

कच्च्या पामतेल आयात कपातीचा मात्र सोयाबीन बाजारावर परिणाम झाला नाही. काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर १०० ते २०० रुपयांनी कमी झाले होते. त्यातही आता हळूहळू सुधारणा होत असून सध्या बाजारात प्लांट गुणवत्तेच्या सोयाबीनचे दर ४१०० ते ४३०० रुपयांदरम्यान आहेत. तर बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनचे दर ४४५० ते ४५५० रुपयांपर्यंत आहेत.  टप्प्याटप्प्याने विक्री फायदेशीर  शेतमाल बाजारात मूलभूत घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे दरात बऱ्याचदा चढउतार होत असतात. असे सोयाबीनमध्ये मागील काही दिवासांमध्ये झाले. दर कमी झाल्यानंतर परत सुधारत आहेत. त्यातच सरकारच्या या निर्णयासंदर्भात अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु सोयाबीनला बाजार मजबूत असून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता एकाचवेळी संपूर्ण माल विकण्याऐवजी टप्‍प्याटप्प्याने बाजारात आणावा, असे आवाहन बाजार विश्‍लेषकांनी केले आहे.  प्रतिक्रिया देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर पामतेलाचा वापर करणाऱ्या गरीब आणि मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बाजारात पामतेल ४ ते ५ रुपये स्वस्त झाले आहेत तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेल एक ते सव्वा रुपये स्वस्त झाले. तेलाचे दर जास्त कमी झाले तर सरकार पुन्हा आयात शुल्क वाढीचा निर्णय घेऊन शकते.  - डॉ. बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर असोसिएशन 

सध्या पामतेलाचे दर ३० रुपयांनी तुटले आहेत, आणखी २० रुपये दर कमी होतील. त्यापेक्षा अधिक दर कमी होणार नाहीत. सोयाबीनचे दरही गेल्या काही दिवसांत तुटून ४३०० रुपयांवर आले आहेत. त्यात डिसेंबरमध्ये आणखी घट होणार नाही.  - दिनेश सोमाणी, शेतमाल बाजार विश्‍लेषक 

खूप मेहनतीने खाद्यतेल आयात शुल्क वाढविले होते. तेलबिया पिकांचे दर नुकतेच वाढत होते. त्यामुळे शेतकरीही तेलबिया पेरणी वाढवत होते. मात्र मध्येच काय माशी शिंकली काय माहीत. पण मी कालच केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. यासंबंधी लवकरच पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे.  - पाशा पटेल, माजी अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग 

कच्च्या पामतेल आयात कपातीचा कोणताही परिणाम सोयाबीनवर होणार नाही. सरकारने उद्या रिफाइंड पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या आयात शुल्कातही कपात केली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील घटकांमुळे सोयाबीन दरात फारसा फरक पडणार नाही.  - प्रमोद बंसल , सोयाबीन व्यापारी, मध्य प्रदेश 

सरकारच्या निर्णयाचा कोणताही परिणाम सोयाबीन दरावर होणार नाही. सध्या बाजारात ४२०० ते ४३०० रुपये दराने प्लांट गुणवत्तेचे तर बियाणे गुणवत्तेचे सोयाबीन ४५०० रुपयाने विकत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कारणांमुळे दरातील ही तेजी कायम राहील.  - आनंद चरखा, संचालक, बालाजी कृषी बाजार, वाशीम 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com