शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच : उद्धव खेडेकर

शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच : उद्धव खेडेकर
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच : उद्धव खेडेकर

शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या नीटनेटकेपणाने हाताळायला हवे ते कोणत्याही सरकारने आजपर्यंत दुर्दैवाने केले नाही, त्यामुळे ते प्रश्न कायम आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत तर त्या प्रश्नांना कुठेच स्थानच नसल्याची स्थिती आहे. वीज, पाणी, रस्ते याशिवाय शेतीविकास व याशिवाय शेतकऱ्यांचा विकास शक्‍य नाही. शेतीसाठी रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांनंतर बऱ्यापैकी सुटलेला दिसतो. परंतु, वीज आणि पाण्याचे प्रश्न अजूनही कायम आहे. वीजनिर्मितीच्या प्रचलित साधनांना मर्यादा असताना शेतीपंपासाठी सौर ऊर्जेद्वारे वीज द्यायला हवी. हवामान बदलासाठी सक्षम यंत्रणा आपल्याकडे नाही. दोन-चार किलोमीटरच्या अंतरात पावसाच्या तफावतीची दखल घेतली, तर पावसाची ही परिणामकारक तफावत मोजण्याची साधन आपल्याकडे दिसत नाहीत. पाऊस कधी आणि कसा पडणार हे अजूनही स्पष्टपणे आपल्याला कळत नाही. 

पावसाचे दिवस कमी होताहेत, त्यानुषंगाने कमी दिवसाचे वाण विकसित करण्यावर संशोधन व्हायला हवं. कमी झालेले पावसाचे दिवस पाहता जमिनीतील ओलावा किती काळ टिकतो त्यानुसार ते पाणी हार्वेस्ट करणारी त्या कालावधीची वाण विकसित व्हायला हवी. जंगली प्राण्यांचा त्रास भयानक वाढला आहे. प्राण्यांच्या कळपामुळे शेती करण अवघड झालंय. अभयारण्य निर्माण केली गेली, परंतु त्यामध्ये त्या जनावरांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे कदाचित हे घडत असावं, पण त्यावर कुणीही गंभीर दिसत नाही. बाजारभावाचा प्रश्न फार गंभीर आहे. कांदा, कापसाच्या दराने हे वारंवार सिद्ध केलंय. तुम्ही किती पिकवलं म्हणजे तुम्हाला किती दर मिळेल याविषयी धोरणात्मक ठोस निर्णय घ्यायला हवा. 

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानासोबतच दराची शाश्वती मिळणे आवश्‍यक आहे. कर्जमाफी, वीजबिलमाफी ही तात्पुरती मलमपट्‌टीच आहे. शेतीपंपासाठी लागणाऱ्या विजेवर आकारले जाणारे वारेमाप व्याज व इतर अधिभार वीजबिल थकण्याला व त्याचा आकडा फुगण्याला कारणीभूत ठरत आहे. बाजारभाव मिळवून देण्यासाठी मूल्यवर्धन साखळी आवश्‍यक आहे. उत्पादन जास्त झाले की दर पडतात असं मानल जातं. त्यामुळे देशाची एकूण जनता किती, तिची धान्य, कडधान्य, फळं, भाजीपाला, तेल आदींची गरज लक्षात घेऊन नियोजन केलं तर ते शक्‍य आहे. पेरणीपूर्वीचं शेतकऱ्यांना त्यांनी काय पेरलं किती उत्पादित केलं तर काय दर मिळेल हे कळायला हवं. त्यासाठी यंत्रणा सक्षम करणे अत्यावश्‍यक आहे. शेतीला उत्तम बियाणे व निविष्ठा, सिंचनासाठी पाणी त्यासाठी दिवसा वीज, बाजारपेठ व त्यातून बाजारभाव मिळवून देणारा राजाश्रय मिळायला हवा.  - उद्धव खेडेकर, कृषिभूषण,  शिवणी, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com