मुंबईत शक्तिप्रदर्शनाने  उमेदवारांचे अर्ज दाखल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई   ः मुंबईतील सर्वच प्रमुख उमेदवारांनी सोमवारी (ता. ८) जोरदार शक्तिप्रदर्शन करीत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. या वेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला होता. रोड - शो, बाईक रॅली काढून तसेच ढोलताशाच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. उमेदवारी अर्ज भरताना महाआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी ऐकीचे दर्शन घडविले.

मुंबई दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा, शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी ओल्ड कस्टम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. देवरा अर्ज भरत असताना उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. या वेळी काँग्रेसचे भाई जगताप, अमीन पटेल, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर उपस्थित होते.  अरविंद सावंत यांचा अर्ज भरताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, अजय चौधरी, श्रद्धा जाधव, आशीष चेंबूरकर उपस्थित होते.

दक्षिण - मध्य मुंबईतून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरताना दोघांनी शक्तिप्रदर्शन केले. या वेळी महाआघाडी आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी समवेत होते. उत्तर - मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी अभिनेता संजय दत्त, माजी आमदार बाबा सिद्दीकी हे प्रिया दत्त यांच्यासोबत होते. प्रिया दत्त यांची लढत भाजपच्या पूनम महाजन-राव यांच्याशी आहे. पूनम महाजन -राव यांनी याआधीच अर्ज दाखल केला आहे.

ईशान्य मुंबईतून भाजप उमेदवार मनोज कोटक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी किरीट सोमय्या, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवसेना नेते लीलाधर डाके, आमदार सुनील राऊत उपस्थित होते. मुंबई वायव्य मतदारसंघातून काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी रोड शो करत अर्ज भरला. मातोंडकर यांची लढत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com