दक्षिण अशियात मॉन्सून सरासरी गाठणार; महाराष्ट्राच्या सर्वच भागात...

भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये सर्वसामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
monsoon
monsoon

पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये सर्वसामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. श्रीलंका, मालदीवसह दक्षिण अशिया आणि वायव्य अशियातील पाकिस्तानात सरासरीपेक्षा अधिक, तर उत्तर आशिया, उत्तर बंगालच्या उपसागरालगतच्या भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पुर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे.  २०१९ मधील मॉन्सूनच्या पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील (२०२०) अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची सोळावी दोन दिवसीय बैठक २० ते २२ एप्रिल कालावधीत झाली. जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाची बैठक ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून घेण्यात झाली. भारतासह, अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांसह जागतिक हवामान संघटनेबरोबरच इतरही आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे. 

प्रशांत महासागरात सध्या सौम्य उष्ण ‘एल-निनो’ स्थिती आहे. मॉन्सून हंगामात एल-निनो सर्वसामान्य पातळीवर असले. तर हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात सौम्य ला-निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. २०१९ च्या पहिल्या तिमाहीपासून विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सौम्य एलनिनो स्थिती होती. ऑक्टोबर महिन्यात सौम्य उष्ण पातळीवर पोचलेली स्थिती आतापर्यंत कायम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. प्रशांत महासागरातील एल-निनो, इंडियन ओशन डायपोल, उत्तर गोलार्धातील उन्हाळा आणि हिवाळ्यातील बर्फाचे आच्छादन, जमीनीचे तापमान आदी प्रादेशिक आणि जागतिक घटकांचा मॉन्सून क्षेत्रातील पावसावर परिणाम याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.  प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागाच्या स्थितीबरोबरच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकाचाही (इंडियन ओशन डायपोल -आयओडी) मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होतो. सध्या दक्षिण हिंद महासागरात उष्ण तापमान असून, आयओडी स्थिती सर्वसाधारण आहे. तर मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार असून, काही मॉडेलच्या आधारे सौम्य नकारात्मक होण्याची शक्यता आहे. सकारात्मक आयओडी स्थितीमुळे दक्षिण आशियात सरासरीपेक्षा अधिक, तर नकारात्मक आयओडी स्थितीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, असे संकेत आहेत. उत्तर गोलार्ध आणि युरेशियात डिसेंबर ते मार्च महिन्याच्या कालावधीत बर्फाचे अच्छादन सरसरीपेक्षा कमी होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ते खुपच कमी होते. युरेशियातील हिवाळा व उन्हाळ्यातील बर्फाचे प्रमाण व दक्षिण आशियातील मॉन्सून यांच्यात परस्परविरोधी संबंध असतो, असही नमूद करण्यात आले आहे.  महाराष्ट्रात सरासरीइतका पावसाची शक्यता अधिक  ‘सॅस्कॉफ’मार्फत पावसाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता ५० ते ६० टक्के आहे. संपुर्ण देशाचा विचार करता यंदा अंदमान निकोबार, लक्षद्वीप बेट समुह, केरळ, तसेच तामिळनाडूच्या दक्षिण भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. तर उत्तर बंगालच्या उपसागरालगत आडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीय भाग, जम्मूकाश्‍मिर मधील उत्तर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com