राज्यात सर्वदूर हलका पाऊस

राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. १२) कोल्हापुरातील गगनबावडा येथे १०७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
rain
rain

पुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. १२) कोल्हापुरातील गगनबावडा येथे १०७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यांत दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे नदीनाल्यांची पाणीपातळी देखील खालावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यांतील बहुतांशी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला तर उर्वरित तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अनेक भागांत पावसाचा जोर ओसरल्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत देखील मोठी घट झाली आहे. पाऊस ओसरल्यामुळे पुराचा धोका देखील टळला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील धरणक्षेत्रात पाऊस सुरुच राहिल्याने राधाननगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी (ता.१२) खुलेच होते. या दरवाजातून ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. जिल्ह्यातील पंचगंगा, कुंभी, वारणा दुधगंगा आदी नद्यांवरील २४ बंधारे पाण्याखाली आहेत. गगनबावडा, आजरा, चंदगड तालुका वगळता अन्य तालुक्यात थांबून थांबून पावसाच्या सरी असेच स्वरुप राहिले. हातकणंगले शिरोळ तालुक्यात मुख्यत्वे करुन ढगाळ हवामान राहिले आहे.  

मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा, वाई तालुक्यात अनेक हलका ते मध्यम पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती. आत्तापर्यंत जिल्ह्यातील सहा धरणे भरली असून तीन धरणांत ८० टक्क्यापेक्षा अधिक भरली आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर भागात अधूनमधून सरी बरसत भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात झाला. तर पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यातील अनेक भागात तुरळक सरी झाल्या. दारणा व भावली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने अनुक्रमे १२५० व ४८१ क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तर हतनूर, गिरणा, दारणा, करंजवण, गंगापूर धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. सोलापूर, खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.  

मराठवाड्यात नुसती भुरभुर मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. बुधवारी अनेक भागात हवामान ढगाळ होते. मात्र, येलदरी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे ९६.९३ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे बुधवारपासून दोन संचाद्वारे वीज निर्मिती  सुरू करण्यात आली होती.  

विदर्भात हलका पाऊस विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम अमरावती, बुलडाणा  जिल्ह्यांत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस झाला. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जुलै-ऑगस्ट दरम्यान प्रकल्प तुडुंब भरू लागले आहेत. वऱ्हाडातील काटेपूर्णा, खडकपूर्णा, वान, नळगंगा, पेनटाकळी हे मोठे प्रकल्प समाधानकारक भरले आहेत. वान प्रकल्पात अद्यापही पुरेसा साठा झालेला नाही. धरणांच्या क्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पात वेगाने वाढ होत असून हा प्रकल्प ९० टक्के भरला. बुलडाण्यातील खडकपूर्णा प्रकल्पात २.५२ टीएमसी साठा आहे. पेनटाकळी, नळगंगा प्रकल्पातही साठा सुधारला. तरीही वान प्रमाणेच नळगंगा प्रकल्प क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वऱ्हाडातील सोनल, एकबुर्जी (जि. वाशीम), मस, उतावळी (जि. बुलडाणा) हे चार मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. अकोल्यातील निर्गुणा, मोर्णा, वाशीममधील अडाण, बुलडाण्यातील ज्ञानगंगा, पलढग, कोराडी, तोरणा  हे प्रकल्प बऱ्यापैकी भरले आहेत. तर अनेक लघू प्रकल्प ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात भरले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.   बुधवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस (मिलिमीटर) कोकण : सांताक्रुझ ३०.७, डहाणू ४३, मोखेडा ४८.२, तलासरी ४४, वसई ४२, विक्रमगड ६१, वाडा ६९, भिरा ७६, कर्जत ५२.५, खालापूर ८४, महाड ४५, माणगाव ५२, माथेरान ७२.२, म्हसळा ५१, पेण ४०, पोलादपूर ७३, रोहा ४२, तळा ५१, चिपळूण ७०, खेड ५२, लांजा ६८, मंडणगड ६५, राजापूर ३१, संगमेश्वर ४८, दोडामार्ग ६१, कणकवली ३४, कुडाळ ४७, मालवण ४९, सावंतवाडी ७४, वैभववाडी ४१, अंबरनाथ ५०.४, भिवंडी ७५, कल्याण ५१, शहापूर ४५, ठाणे ५९, उल्हासनगर ५४. मध्य महाराष्ट्र ः आजरा ४९, चंदगड ३१, गगनबावडा १०७, पन्हाळा ३५, राधानगरी ६४, शाहूवाडी ४१, अक्कलकुवा २१, नंदुरबार २६, नवापूर ४०, इगतपुरी ७१, ओझरखेडा २५.२, पेठ २८, सुरगाणा २९.१, लोणावळा कृषी ५८, वेल्हे ३४, महाबळेश्वर ५८.६. विदर्भ : सावळी २९.४, सिंदेवाही २०.९, धानोरा ३०.१, एटापल्ली २३.९, कोर्ची २५.९, मुलचेरा ५१.२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com