शेतीमाल निर्यात अनुदान योजनेत अस्पष्टता 

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून सुरू असलेली ‘मर्चंडाइस एक्स्पोर्टस फ्रॉम इंडिया स्कीम’(MEIS) ही निर्यात प्रोत्साहन योजना ३१ डिसेंबरपासून बंद झाली.
grapes
grapes

नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून सुरू असलेली ‘मर्चंडाइस एक्स्पोर्टस फ्रॉम इंडिया स्कीम’(MEIS) ही निर्यात प्रोत्साहन योजना ३१ डिसेंबरपासून बंद झाली. त्याऐवजी ‘रेमिशन ऑफ ड्यूटीस अँड टॅक्सेस ऑन एक्स्पोर्ट प्रॉडक्ट्स’(RoDTEP) या नावे नवीन कर परतावा योजना आणली आहे. मात्र त्यासंबंधी स्पष्टता व अधिकृत तपशील उपलब्ध नसल्याने पुरता गोंधळ उडाला आहे. पूर्वीसारखे निर्यात अनुदान मिळत नसल्याने शेतीमाल निर्यातदार अडचणीत आले आहेत. 

नवी ‘आरओडीटीईपी’ योजना १ जानेवारीपासून लागू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र यासंबंधी अद्याप कुठलीही स्पष्टता नसल्याने अनुदान वा योजनेचा लाभ कसा मिळणार याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे सध्या निर्यात सुरू झाल्याने कमी दरात द्राक्ष खरेदी सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर नव्या योजनेत नसलेली स्पष्टता, बंद झालेले अनुदान व निर्यात खर्चात वाढ झाल्याने ही स्थिती असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. 

केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाकडून ‘एमईआयएस’ योजनेऐवजी सुरू झालेल्या नव्या ‘आरओडिटीईपी’ योजनेच्या कुठल्याच मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त नाहीत. त्यामुळे या नव्या योजनेत किती व कसा लाभ मिळणार याबाबत अनेक निर्यातदार अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नवी योजना नावापुरती लागू कधी झाली असल्याने निर्यातदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.  योजना फक्त घोषणेपुरती?  योजनेच्या अनुषंगाने तपशीलवार कार्यपद्धतीसंबंधी नवीन अधिसूचना जाहीर करण्यापूर्वी महसूल व वित्त विभागाचा सल्ला घेऊन घोषणा करण्यात येईल, या आशयाचे पत्र वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचलनायने १५ एप्रिल २०२० रोजी काढले होते. मात्र त्यावर पुढे काय चर्चा झाली की नाही असा प्रश्‍न आहे. तर अधिक तपशील केंद्राच्या संकेतस्थळा वर उपलब्ध नाही.  ऐन हंगामात द्राक्षदराला बसतोय सर्वाधिक फटका  सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होऊन गती येऊ लागली आहे. मात्र नव्या योजनेत निर्णयाची स्पष्टता नसल्याने निर्यातदारांना काम करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी सुरू असलेल्या द्राक्ष खरेदीत अपेक्षित दर मिळत नाहीत. तर निर्यातीचा खर्च भरून काढण्यासाठी कमी दर दिले जात असल्याची स्थिती आहे.  प्रतिक्रिया  पूर्वीची योजना निर्यात प्रोत्साहन स्वरूपात राबवली जात होती. नवीन योजना कर परतावा स्वरूपात आहे. जे कर निर्यातीसाठी लागतील ते परत मिळणार असल्याचे समजते. या योजनेची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात कार्यान्वित नाही. यासंबंधी अधिक माहिती दिलेली नाही. त्यासाठी लवकरात लवकर स्वरूप स्पष्ट करून अंमलबजावणी करावी.  - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, मोहाडी, जि. नाशिक 

प्रस्तावित नवीन योजना १ जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून निर्णय झाल्यानंतर सर्व बाबी समोर येईल. अद्यापतरी निर्णय झालेला नाही. पूर्वीच्या योजनेच्या संदर्भात प्रलंबित अनुदान मिळणार आहे.या योजनेच्या अनुषंगाने घोषणा झाल्यानंतर योजनेतील लाभ हे १ जानेवारीपासून निर्यातदार यांनी मिळतील. त्यामुळे नाशिकचे द्राक्ष गुणवत्तापूर्ण असल्याने दर पाडून खरेदी करू नये.  - डॉ. भारती पवार, खासदार-दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com