हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा 

माझी ताकद शिवसैनिक आहे. त्यांच्या हिंमतीवरच मी तुमच्यासोबत लढेन. तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंदी आहे,’’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
हे हिंदुत्व नाही - उद्धव ठाकरे This is not Hindutva - Uddhav Thackeray
हे हिंदुत्व नाही - उद्धव ठाकरे This is not Hindutva - Uddhav Thackeray

मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू नका, समोरासमोर या. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलो, तरी पोलिसांच्या मागे लपून कारवाया करत नाही. माझी ताकद शिवसैनिक आहे. त्यांच्या हिंमतीवरच मी तुमच्यासोबत लढेन. तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंदी आहे,’’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.  शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब आदींसह आमदार, नगरसेवक, महापौर, विभागप्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. आपल्या कामांची चित्रफीत दाखवत शिवसेनेने मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात केली.  भाजपचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ‘‘कोणाच्या कुटुंबावर, पत्नीवर आणि मुलांवर वैयक्तिक आरोप करणे, कोणाच्या तरी आडून लपून हल्ले करणे आणि तो मी नव्हेच, असे सांगणे हे हिंदुत्व नसून, नामर्दपणा अन् षंढत्व आहे. देशातील बंदरांच्या सीएसआरमधील ७५ टक्के निधी मोदी सरकारने गुजरातकडे वळवला आहे. आज उपटसुंभ नव हिंदूंपासून हिंदुत्व धोक्यात आहे. कारण हिंदुत्वाची शिडी करून वर चढलेले आता इंग्रजांची फोडा व झोडा नीती वापरत आहेत. त्यामुळे जात-पात-धर्म विसरून मराठी माणसाची एकजूट बांधा. मराठी-अमराठी हा भेदभाव गाडून हिंदूंची एकजूट बांधा.’’ 

राज्याची बदनामी का?  देशात जणू काही फक्त महाराष्ट्रातच गांजा-चरस यांचा वापर होतो, असे चित्र उभे केले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांनी एक सेलिब्रिटी पकडला तर ढोल वाजवले जातात. मात्र, मुंबई पोलिस त्याहीपेक्षा मोठी कामगिरी करतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष होते. राज्यात अमली पदार्थ आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या छाप्यांबाबतही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, ‘सत्तेचे व्यसन अमली पदार्थ आहे. छापा टाकून काटा काढायचा, हे प्रकार जास्त दिवस चालू शकणार नाहीत. भाजपसोबत असले की गंगा, नाही तर गटारगंगा हा सुरू असलेला प्रकार जनतेलाही आता लक्षात येऊ लागला आहे.’ कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप हे हिंदुत्व नाही, तर षंढपणा असल्याची चीडही ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईत गेल्या महिन्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा उल्लेखही ठाकरे यांनी केला. या प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरच फासावर लटकवले जाईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

मत्सरातून राज्याच्या संस्कृतीवर हल्ले  हर्षवर्धन पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सत्तापिपासूपणावरही टीका केली. त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवले असले, तर कदाचित मी राजकारणातूनही बाजूला झालो असतो. मी वचन पाळण्यासाठी मुख्यमंत्री झालो. मै फकीर हू... झोली फैला के बैठा हू, असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, असे आव्हानही त्यांनी दिले. महाराष्ट्राची आगेकूच पाहून काहींच्या पोटात दुखत असल्याने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी आपल्या संस्कृतीवर हल्ले होत आहेत. सत्ता घ्या हवीतर, पण आमच्यासारखे काम करून दाखवा, असेही ठाकरे यांनी बजावले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com