`not only buds and flowers but also rain destroys our destiny`
`not only buds and flowers but also rain destroys our destiny`

`कळ्या अन्‌ फुलंच न्हाई, तर पावसानं आमचं नशीब बी झोडून नेलं`

आधीचीच मदत मिळाली न्हाई, आताही पंचनाम्यासाठी कुणी आलं न्हाई, पर सरकारची मदत किती मिळणाराय, त्यानं काई भागणार न्हाई, विमा भरतो, पण त्याचा बी काई भरवसा न्हाई, म्हनून यंदा तेबी भरला न्हाई. जाऊ द्या नशीब आपलं. - यशवंत खंडागळे, शेतकरी, संगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर.

सोलापूर : आधी पाणी नसल्यानं बाग धरता आली न्हाई, आता पाण्याच्या भरोशावर धरली, त्याला बी चांगला ५७ हजारांचा खर्च आला. तोबी उसनवारीवर केला. आता कुठं चांगल्या कळ्या सुटत होत्या, फुलं बी लागली व्हती. पार ते सगळं पाण्यात गेलं, नुसत्या कळ्या अन्‌ फुलंच न्हाई, पावसानं आमचं नशिबबी झोडून न्हेलंय, अशा शब्दांत संगेवाडी (ता. सांगोला) येथील शेतकरी यशवंत खंडागळे आपली व्यथा सांगत होते.

दर दोन महिन्याला बॅंकवाले हेलपाटे मारतायेत, आता त्यांना काय म्हून त्वांड दावायचं, देणं कसं द्यायचं आणि घर कसं चालवायचं, अशी चिंताही त्यांनी बोलून दाखवली.

पंढरपूर- सांगोला महामार्गावर संगेवाडीत रस्त्यालगतच खंडागळे यांची पाच एकर शेती आहे. त्यात सव्वा एकर डाळिंब आणि बाकी क्षेत्रावर अन्य हंगामी पिके घेतली जातात. पत्नी रंजना, सागर आणि दयानंद ही दोन मुले असे चौकोनी कुटुंब. त्यांचा सगळा भार शेतीवर. मोठा मुलगा सागर बाहेरुन कॉलेज करत मिळेल ते काम करतोय, तर दयानंद आयटीआय करतोय. दुर्दैव म्हणजे पत्नीला दोन्ही डोळ्यांनी कमी दिसते. त्यामुळे यशवंतरावांना शेतीकडे बघावं लागतंच. पण घरातही स्वयंपाकासह अन्य कामेही करावी लागतात, जगण्याच्या आघाडीवर त्यांची ही दुहेरी लढाई त्यामुळे काहीशी वेगळी आणि अप्रुप वाटावी अशी. ते शेती करतच मोलमजुरीही करतात. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा डाळिंब लावले. 

मध्यंतरी एक- दोन वेळा काय ते उत्पन्न मिळालं तेवढंच. त्यात पत्नीच्या डोळ्याचं ऑपरेशन आणि काही देणी दिली. पण आयुष्य फार काही पुढं सरकलं नाही. आजही ते झोपडीत राहतात, या झोपडीलाही अनेक ठिकाणी थिगळं आहेत, तीही प्लॅस्टिक कागदांनी झाकली आहेत. यंदा पहिल्यांदाच एवढं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

खंडागळे पुढे म्हणाले, की आधी पाऊस नसल्याने डाळिंबाचा बहर धरला नाही, परतीचा पाऊस पडेल, या आशेवर ऑगस्टमध्ये छाटणी, पानगळ करून बहर धरला. दीड-दोन महिनेच झाले असतील, आता चांगल्या कळ्या सुटल्या व्हत्या, फुलंबी लगडली व्हती. तोवर पावसानं घाला घातला. बरं, एक-दोन दिवस न्हाई, १५-२० दिस झालं, त्याची रिपरिप सुरूच व्हती, आधीचं बॅंकेचं ५० हजारांचं कर्ज हाय, त्यात या दोन महिन्यांत उसनवारी करून ५७ हजारांचा खर्च केलाय, पण कसंच काय सगळं पाण्यात गेलं बघा.

आवंदा किमान तीन-साडेतीन लाखाचं त्वांड पाह्यलं असतं, बॅंकवाले दर दोन महिन्याला हेलपाटे मारतायेत. आता हे उसनं पैसं, हे सगळं कसं द्यावं अन् काय, असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com