नगर जिल्ह्यात आठ छावण्यांना सव्वा कोटी दंडाची नोटीस

नगर जिल्ह्यात आठ छावण्यांना सव्वा कोटी दंडाची नोटीस
नगर जिल्ह्यात आठ छावण्यांना सव्वा कोटी दंडाची नोटीस

नगर : छावणीत पशुधनाच्या सुविधेत वारंवार कुचराई, शासकीय नियमांचा भंग केल्याचे तपासणीत आढळून आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तसा अहवाल पथकांकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कर्जत तालुक्‍यातील आठ छावणीचालक संस्थांना एक कोटी ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. तशा आशयाची नोटीस देऊन त्यांच्याकडून म्हणणे मागविले आहे. संबंधित संस्थांना ४८ तासांत याबाबत खुलासा करावा लागणार आहे. मोठ्या रकमेच्या दंडामुळे छावणीचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू केल्या. मागील महिन्यात त्याचा आकडा अगदी ५११ पर्यंत गेला होता. छावण्यांत सुमारे तीन लाख ३६ हजार जनावरे होती. मध्यंतरीच्या पावसाने काही छावण्या बंद केल्या, परंतु पाऊस नसल्याने बंद केलेल्या छावण्या पुन्हा सुरू कराव्या लागल्या.

आजअखेर जिल्ह्यामध्ये २२६ छावण्या सुरू आहेत. त्यांत एक लाख ३० हजार ७७१ पशुधन आहे. या जनावरांना योग्य सुविधा मिळतात का, याची पडताळणी करण्यासाठी तपासणी पथके कार्यरत होती. छावण्यांत सुविधा दिल्या जात आहेत, की नाही, यावर द्विवेदी यांनी लक्ष ठेवले. कर्जत तालुक्‍यातील आठ छावण्यांमध्ये तपासणीत अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे त्यांना दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत. 

तपासणीमध्ये त्रुटी व अटी- शर्तींचे उल्लंघन झाल्याने आजपर्यंत ७० लाख रुपये दंडाची कारवाई केली आहे. मागील आठवड्यात ४२ चारा छावणी चालक संस्थांना एक लाख ८० हजार रुपये दंड केला होता. शुक्रवारी आणखी नव्वद छावण्यांवर दंडात्मक कारवाई केली. ९० चारा छावण्यांना ठोठावण्यात आलेल्या दंडाची एकूण रक्कम तीन लाख ७९ हजार ८९५ आहे. 

यांना बजावल्या नोटिसा (कंसात विचाराधीन दंडाची रक्कम)

  • कर्जत तालुका दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ (१६,०८,७००) 
  • संकल्प ग्रामीण विकास संस्था, बाभूळगाव खालसा (३,६५,४७५)
  •  जगदंबा मोटर वाहतूक सरकारी संस्था, करपडी (१३,४८,०००)
  •  भागीरथीबाई सहकारी पाणीउपसा संस्था, राशीन (२५,२८,६००)
  • विविध कार्यकारी सेवा सोसायटी, भोसे (२४,४२,३००) 
  • दत्तकृपा दूधउत्पादक संस्था, तिखी (२,५६,११०) 
  • साई सेवाभावी संस्था, काळेवाडी (१,७१,७७५) 
  • रोकडेश्‍वर शिक्षण संस्था, सोनाळवाडी  (४२,८०,९४०) 
  • या आढळल्या त्रुटी 

    पशुधनाची ऑनलाइन हजेरी न घेणे, बार कोड व टॅगिंग नसणे, जनावरांच्या संख्येत तफावत, रेकॉर्ड अद्ययावत नसणे, जनावरांना चारावाटप न करणे आदी त्रुटी तपासणी पथकाला आढळून आल्या.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com