मराठवाड्यात मोसंबी पिकात पोषणद्रव्याची कमतरता

औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांना मार्गदर्शन करताना डॉ. संजय पाटील.
औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांना मार्गदर्शन करताना डॉ. संजय पाटील.

औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील बहुतांशी मोसंबी बागांमध्ये मृग बहराची जोरदार फळधारणा झाली आहे. या झाडांना आवश्यक त्या प्रमाणात जास्तीची खत मात्रा न दिल्याने फळांचा आकार लहान व फळे अकाली पिवळसर होत असून मोसंबी पिकात पोषणद्रव्याची कमतरता आहे,’’ अशी माहिती बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख कृषी शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली. मराठवाड्यात जवळपास २८ हजार हेक्टरवर मोसंबीच्या उत्पादनक्षम बागा आहेत. जवळपास ८० टक्के बागांवर मृग बहाराची फळे कमी अधिक प्रमाणात लगडली आहेत. औरंगाबाद तालुक्यातील सय्यदपूर येथे गुरुवारी (ता. ३०) रोजी आयोजित प्रक्षेत्र भेटी दरम्यान डॉ. पाटील यांनी मोसंबी उत्पादकांना याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मागील कडक उन्हाळा व पाण्याची दुर्भिक्षता या मुळे मोसंबी झाडांना मृग बहरासाठी चांगला ताण बसला. यामुळे झाडांना भरपूर फळधारणा झाली. विरळणीचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याने फळसंख्या झाडाच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे फळांना पोषणमूल्यांची मात्रा पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने फळांच्या प्रतीवर विपरीत परिणाम होऊन अकाली फळे पिवळी पडल्याचे दिसून येत आहे.’ ’विषय विशेषज्ञ युवराज भोगील म्हणाले, ‘‘रासायनिक खतासोबत दुय्यम व सूक्ष्म मूलद्रव्याची मात्रा मोसंबी झाडांना दिल्यास झाडाची वाढ, निरोगीपणा वाढीस लागून झाडे दीर्घायुषी बनण्यास मदत मिळते. झाडे दीर्घकाळ उत्पादनक्षम राहण्यासाठी संतुलित प्रमाणावर वेळोवेळी खतांचा पुरवठा करण्याची गरज आहे.’’ या वेळी मोसंबी उत्पादक भाऊसाहेब डवणे, मुरलीधर डवणे, अप्पासाहेब डवणे, भाऊसाहेब गवारे, सुखदेव गवारे, गणेश जाधव आदी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन समर्पक उत्तरे देऊन शंकानिरसन करण्याचा प्रयत्न तज्ज्ञांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com