परभणीत राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्जासाठी अडवणूक

रब्बी हंगामात देखील परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. खरीप हंगामात ही अशीच स्थिती होती. चालढकल केली जात असल्यामुळे या बॅंकांकडे पीककर्ज मागणीचे अर्ज पडून आहेत. अनेक शाखांमध्ये मध्यस्थांचे प्रस्थ वाढले असून, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास वेळ लागत आहे.
Obstacles to crop loans from nationalized banks in Parbhani
Obstacles to crop loans from nationalized banks in Parbhani

परभणी ः रब्बी हंगामात देखील परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. खरीप हंगामात ही अशीच स्थिती होती. चालढकल केली जात असल्यामुळे या बॅंकांकडे पीककर्ज मागणीचे अर्ज पडून आहेत. अनेक शाखांमध्ये मध्यस्थांचे प्रस्थ वाढले असून, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास वेळ लागत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील बॅंकांतर्फे सोमवार (ता. २८) पर्यंत ९ हजार ८६१ शेतकऱ्यांना ५३ कोटी ४२ लाख रुपये (११.८२ टक्के) एवढ्या पीककर्वाटप करण्यात आले  आहे. जिल्ह्यातील बॅंकांना यंदाच्या रब्बी हंगामात ४५१ कोटी ८७ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांना २५८ कोटी ३४ लाख रुपये, खासगी बॅंकांना ३४ कोटी ८३ लाख रुपये, महाराष्ट्र्र  ग्रामीण बॅंकेला ४७ कोटी ४८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १११ कोटी २२ लाख रुपये उद्दिष्ट आहे. रब्बी पीककर्ज वाटप सुरू होऊन तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु अद्याप वाटप १५ टक्केच्या आतच अडकलेले आहे.

जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखांना सर्वाधिक  पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले तरी त्यांची पीककर्ज वाटपाची गती अतिशय संथ असून आजवर २ हजार १२३ शेतकऱ्यांना १५ कोटी ९९ लाख रुपये (६.१९ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. त्यात भारतीय स्टेट बॅंकेने १ हजार ५१० शेतकऱ्यांना ११ कोटी ३२ लाख रुपये (८.३६ टक्के), बॅंक आॅफ बडोदाने ४ शेतकऱ्यांना ६ लाख रुपये, बॅंक आॅफ इंडिया ने १३८ शेतकऱ्यांना १ कोटी २ लाख रुपये, बॅंक आॅफ महाराष्ट्राने २०० शेतकऱ्यांना १ कोटी १० लाख रुपये, कॅनरा बॅंकेने २३ शेतकऱ्यांना १४ लाख रुपये, युनियन बॅंकेने १४४ शेतकऱ्यांना १ कोटी ४८ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे. सेंट्रल बॅंक आॅफ इंडिया, इंडियन बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक या बॅंकांनी सोमवार (ता. २८) कर्जवाटप केले नव्हते.

चार खासगी बॅंकांपैकी एचडीएफसी बॅंकेने १ शेतकऱ्यास ७ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बॅंकेने १८४ शेतकऱ्यांना २ कोटी ८७ लाख रुपये वाटप केले आहे. अॅक्सिस आणि आयडीबीआयचे वाटप सुरू नाही. महाराष्ट्र ग्रामीण बॅंक कर्जवाटपात आघाडीवर असून आजवर ४ हजार १३२ शेतकऱ्यांना १८ कोटी ५१ लाख रुपये कर्जवाटप केले. गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील बॅंकांनी २ हजार ४६३ शेतकऱ्यांना १८ कोटी १६ लाख २ हजार रुपये (५.७९ टक्के) पीककर्ज वाटप केले होते. यंदा त्यापेक्षा दुप्पट वाटप झाले आहे एवढीच समाधानाची बाब आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com