‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करा

राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय स्वाक्षरी प्रमाणपत्रांचे (डीएससी) कामकाज रखडणे ही गंभीर बाब आहे. या प्रक्रियेत अडथळे आणल्यास यापुढे कठोर कारवाई करा, असे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत.
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करा Obstacles to DSC Take action if brought
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करा Obstacles to DSC Take action if brought

पुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय स्वाक्षरी प्रमाणपत्रांचे (डीएससी) कामकाज रखडणे ही गंभीर बाब आहे. या प्रक्रियेत अडथळे आणल्यास यापुढे कठोर कारवाई करा, असे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.   केंद्राकडून पंधराव्या वित्त आयोगापोटी राज्याला पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास निधी मिळाला आहे. मात्र त्यातील तीन हजार कोटींचा निधी पडून आहे. यामुळे हजारो ग्रामपंचायती निधीविना ताटकळल्या आहेत. सरपंच व ग्रामसेवकांची वेळेत ‘डीएससी’ न केल्यामुळे हा गोंधळ तयार झाला झाल्याचे वृत्त ‘अग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ग्रामविकास खात्याने दखल घेत जिल्हा परिषदांना तंबी दिली आहे.   राज्यात २८ हजार ८७५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त सहा हजार ‘डीएससी’ पूर्ण झालेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी ग्रामसेवकांनी वेळत दफ्तर उपलब्ध करून न दिल्यामुळे ‘डीएससी’ रखडली आहे.‘डीएससी’ झाल्यानंतरच वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना मिळू शकतो. हा निधी केवळ ‘पीएफएमएस’ या सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातूनच मिळू शकतो. ‘पीएफएमएस’ प्रणाली केवळ ‘डीएससी’ झालेली असेल तर उपयुक्त ठरते. गैरव्यवहार रोखण्यासाठी ही पद्धत लागू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.   ‘डीएससी’ रखडल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी ग्रामविकासमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. लोकप्रतिनिधींनी देखील तक्रारी केल्याने ग्रामविकास विभागाने आता कडक भाषेत एक परिपत्रक जारी केले आहे. उपसचिव प्रवीण जैन यांनी ‘डीएससी’च्या कामाची अंतिम सर्व जबाबदारी ‘सीईओं’वर दिली आहे.   ‘‘डीएससी’ रखडल्याने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहिला आहे. प्रियासॉफ्टवेअर आणि पीएफएमएस प्रणालीवर ‘डीएससी’ पूर्ण करण्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे पडला आहे. ही बाब आपल्या राज्याच्या प्रतिमेला तडा देणारी आहे. केंद्र शासनाने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे,” असे ग्रामविकास विभागाने  म्हटले आहे. विकासाला खीळ ग्रामपंचायतींच्या विकासकामांना ‘डीएससी’ अभावी खीळ बसली आहे. जिल्हा परिषदांमधील सीईओंनी ही बाब अतिशय गांभीर्याने घ्यावी. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या तीनही स्तरावर ‘डीएससी’ करावी लागते. हे काम युद्धपातळीवर आठवडाभरात करा. या कामात कोणीही असहकार्य करीत असेल किंवा कुचराई करीत असल्यास कठोर कारवाई करा, अशी तंबी ग्रामविकास विभागाने सीईओंना दिली आहे.    ‘डीएससी’ रखडण्याची तीन कारणे 

  • - ग्रामसेवकांनी केंद्रचालकांना दस्तावेज दिले नाहीत. त्यामुळे प्रियासॉफ्टमध्ये ‘डे बुक’ व ‘इयर बुक’ची कामे अर्धवट राहिली. 
  • - चौदाव्या वित्त आयोगाचे वार्षिक पुस्तक पूर्ण (क्लोज्ड) केलेले नाही. 
  • - ग्रामसेवक व सरपंचांनी स्वतःहून डीएससी उपलब्ध करून दिलेली नाही. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com