सोलापुरात शेतीपंप वीजजोडणीवरून अधिकारी धारेवर

सोलापुरात शेतीपंप वीजजोडणीवरून अधिकारी धारेवर
सोलापुरात शेतीपंप वीजजोडणीवरून अधिकारी धारेवर

सोलापूर  : शेतकऱ्यांना द्यावयाच्या शेतीपंपांच्या वीजजोडणीवरून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. याशिवाय या बैठकीला उशिरा उपस्थित राहून बेजबाबदारपणा दाखविल्याबाबतही या अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात शुक्रवारी (ता. ३१) खरीप हंगामपूर्व बैठक आयोजिण्यात आली. पालकमंत्र्यांसह विजयकुमार देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

महावितरणच्या कामकाजाची अधोगती जशी वीजजोडणी योजनेत होती, तशीच अधोगती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतही दिसली. तुमच्याकडे असलेल्या चार योजनाही तुम्हाला व्यवस्थित राबविता येत नाहीत. मला आकडेवारी सांगू नका, रिझल्ट दाखवा, अशी सक्त सूचना डॉ. भोसले यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना केली. 

शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वीजजोडणी मिळत नाही. तुम्ही आणखी सहा महिने कालावधी लागेल, असे सांगत आहात. तुमच्या बोलण्यात आत्मविश्‍वास आणि गांभीर्य दिसत नसल्याचे डॉ. महास्वामी यांनी सांगितले. 

पालकमंत्री देशमुख यांनीही महावितरणच्या या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. कामात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. बिराजदार यांनी खते, बियाण्यांची मागणी आणि पुरवठा याबाबतची सविस्तर माहिती दिली. या वेळी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले आदी उपस्थित होते.  

बियाणे, खतपुरवठ्यावर लक्ष ठेवा

खरीप हंगामासाठी आवश्‍यक बियाणे व खतांची मागणी, उपलब्ध साठा यांचा ताळमेळ घाला. मागणीनुसार खते आणि बियाणे उपलब्ध करून घ्या. ऐनवेळी धावपळ नको, शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला नको. बियाणे आणि खतांचा पुरवठा योग्य प्रकारे होतो आहे ना, यावर लक्ष ठेवा, असेही पालकमंत्री देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

१६३९७ वीजजोड प्रलंबित

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील १६ हजार ३९७ शेतकऱ्यांचे वीजजोडणी प्रस्ताव प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यासाठी अर्ज आले. पण नियुक्त केलेला कंत्राटदार वीजजोडणी देण्यासाठी चालढकल करत अाहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण कारणे नको, उपायावर बोला, असे त्यांना सुनावण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com