अधिकाऱ्यांनी घेतली कर्नाटकच्या रेशीम आयुक्‍तांची भेट

अधिकाऱ्यांनी घेतली कर्नाटकच्या रेशीम आयुक्‍तांची भेट
अधिकाऱ्यांनी घेतली कर्नाटकच्या रेशीम आयुक्‍तांची भेट

औरंगाबाद : एशिया पॅसिफिक परिषदेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकचे रेशीम विभागाचे आयुक्‍त आर. एस. मंजुनाथ यांची भेट घेऊन कर्नाटकातील रेशीम उद्योगाचे स्वरूप, त्यासाठीची यंत्रणा, व्यवस्थेची इत्थंभूत माहिती जाणून घेतली. 

कर्नाटकातील म्हैसूर येथे २ ते ४ मार्चदरम्यान रेशीमविषयक एशिया पॅसिफिक परिषद पार पडली. या परिषदेत रेशीमचे उपसंचालक दिलीप हाके व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी अजय मोहिते सहभागी झाले होते. परिषदेच्या समारोपानंतर पारंपरिक रेशीम उत्पादक राज्य म्हणून नावलौकिक असलेल्या कर्नाटकच्या आत्ताच्या रेशीम उद्योगाची माहिती जाणून घेण्याची अपेक्षा दिलीप हाके यांनी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्याकडे व्यक्‍त केली. त्याला त्यांनी होकार भरल्यानंतर त्यांच्या संवादातून कर्नाटकचे रेशीम आयुक्‍त आर. एस. मंजुनाथ यांची भेट घेण्याची संधी रेशीम उपसंचालक दिलीप हाके व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी अजय मोहिते यांना मिळाली. 

या प्रदीर्घ भेटीत कर्नाटकातील रेशीम उद्योगाची कार्यप्रणाली समजून घेत कर्नाटकात राबविल्या जात असलेल्या रेशीमविषयक योजना, कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची कार्यप्रणाली, त्यांचे वेतन इतर सुविधा, सामाजिक वनीकरण करीत असलेली तुती वृक्ष लागवड व मनरेगांतर्गत रेशीम विभाग करीत असलेली तुती वृक्ष लागवड योजना, तेथील डिजिटल मार्केट आदींविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेतली. 

कर्नाटकाने यंदा १७ लाख अंडीपुंज निर्मिती केली. त्या तुलनेत महाराष्ट्राने यंदा २२ लाख बीव्ही अंडीपुंज निर्मिती केल्याचे समोर आले. शिवाय यंदा कर्नाटक राज्यात पाच हजार एकरवर तुतीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे. तर यंदा महाराष्ट्रात महारेशीम अभियानामुळे जवळपास १५ हजार एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी पूर्ण झाली आहे. कर्नाटकात रेशीम उद्योगाचा गाडा हाकण्यासाठी ४३०० पदांना मान्यता आहे. त्यांच्याकडेही सुमारे निम्मी पदे रिक्‍त आहेत. कर्नाटक सरकारने पुढाकार घेऊन जवळपास ३२ ॲटोमॅटिक रिलिंग युनिट उभारले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात केवळ तीनच रिलिग युनिट आहे.

कर्नाटकातील पारंपरिक रेशीम उद्योग पाहिल्यानंतर आपल्याकडील रेशीम उद्योगाचा गाडा हाकण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचा अंदाज आला. मिळालेल्या माहितीचा रेशीमचा विस्तार करताना उपयोग होईल.  - दिलीप हाके, उपसंचालक रेशीम महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com