ओम बिर्ला लोकसभेचे नवे सभापती

लोकसभेच्या सभापतिपदी ओम बिर्ला यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली
लोकसभेच्या सभापतिपदी ओम बिर्ला यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली

नवी दिल्ली  ः अपेक्षेप्रमाणे खासदार ओम बिर्ला यांची बुधवारी लोकसभेच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. नव्या सभापतींचे स्वागत करताना विरोधकांनी, संसदीय समितीला डावलून विधेयक संमतीचा आग्रह धरणाऱ्या सरकारला चाप लावा, अशी मागणी केली. पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बिर्ला यांनी निष्पक्षतेची ग्वाही देताना सरकारला अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकपणे काम करण्याची सूचना केली. 

लोकसभेत सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांनी अध्यक्ष निवड प्रक्रिया पार पाडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी अनुमोदन दिलेल्या या प्रस्तावाला एनडीएसोबतच कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुकसहित सर्व विरोधी पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिला. संसदीय प्रथेप्रमाणे पंतप्रधानांसह सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी ओम बिर्ला यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना लोकसभा सभापतींच्या स्थानापर्यंत नेले. सर्व खासदार बाके वाजून त्यांचे स्वागत करीत असताना भाजप खासदारांकडून `जय श्रीराम', `भारत माता की जय'ची जोरदार घोषणाबाजी झाली. 

नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगल्याचेही दिसून आले. नरेंद्र मोदींनी ओम बिर्ला यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख केला. मृदुभाषी आणि चेहऱ्यावर सदैव स्मित राखणाऱ्या त्यांच्या नम्रतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. सत्ताधारी बाकांवरून नियमांचे उल्लंघन झाल्यास अध्यक्षांनी त्यांचे कान उपटावेत. सभागृहाची प्रतिष्ठा टिकून राहायला हवी, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. 

श्री. बिर्ला हे राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. कॉंग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी `चर्चा, आक्षेप आणि निर्णय' हे कॉंग्रेसचे धोरण असून, विषय मांडण्याचा विरोधकांना हक्क मिळायला हवा, अशी मागणी केली. योग्य छाननीसाठी विधेयके संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविणे आवश्‍यक असताना गेल्या पाच वर्षांच्या काळात विधेयके संख्याबळाच्या जोरावर थेट संमतीसाठी मांडण्यात आल्याकडे लक्ष वेधताना या प्रकाराला चाप लावला जावा. तसेच, आपली बहुपक्षीय संसदीय लोकशाही असून, सभापतींनी निष्पक्ष राहून संसदेची प्रतिष्ठा जपावी, असेही आवाहन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com