परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार

सोयाबीनचे बियाणे येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरच्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे यांनी दिली.
One and a half thousand quintals of soybean seeds will be available in Parbhani
One and a half thousand quintals of soybean seeds will be available in Parbhani

परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापासून १ हजार ५०० क्विंटल बियाणे प्राप्त होऊ शकेल. या शिवाय शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरचे ३० हजार क्विंटल बियाणे जतन करून ठेवलेले आहे. हे सोयाबीनचे बियाणे येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरच्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे यांनी दिली.

बनसावडे म्हणाले, की परभणी तालुक्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात  सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन एकूण ४५ हजार हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी ७५ किलो या बियाणे दरानुसार ३३ हजार ७५० क्विंटल बियाण्याची गरज आहे. सोयाबीन काढणी ते काढणीपश्‍चात हाताळणी, तसेच घरचे बियाणे जतन करून ठेवण्यासाठी जाणीवजागृती केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःकडील ३० हजार क्विंटल बियाणे जतन करून ठेवले आहे. स्वतःच्या गरजेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत (प्रति नमुना परीक्षण शुल्क ४० रुपये) भरून ४० ते ५० नमुने उगणक्षमता तपासणीसाठी पाठविले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकांमार्फत बीज परीक्षणासाठी पाठविणे गरजेचे आहे.

दरम्यान, परभणी तालुक्यातील खरीप हंगाम बियाणे नियोजन आढावा शनिवारी (ता. २४) घेण्यात आला. या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील, पंचायत समिती सभापती भानुदास डुबे, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, मंडळ कृषी अधिकारी विजय संघई, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सोयाबीन ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या पावसामुळे सोयाबीन बियाणे भिजले. त्यामुळे उगवणशक्ती कमी येते. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून तसेच बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. त्यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी, अशी सूचना आ. पाटील यांनी या वेळी केली. शेतकऱ्यांनी बियाणे म्हणून साठवून ठेवलेल्या सोयाबीनची विक्री करू नये. योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com