भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बातम्या
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी नावनोंदणी
राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला काही ठिकाणी बुधवार (ता. २०) पासून सुरुवात झाली आहे. तूर खरेदी सुरू करण्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने पुढाकार घेतला आहे.
अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला काही ठिकाणी बुधवार (ता. २०) पासून सुरुवात झाली आहे. तूर खरेदी सुरू करण्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. यंदा सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाने यावर्षी ६ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला असून, सध्या बाजारात या दराच्या बरोबरीने भाव मिळत असल्याने यंदाच्या शासकीय खरेदीला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत सुरुवातीपासूनच साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.
तूर खरेदीच्या दृष्टीने यापूर्वीच नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार बुधवारपर्यंत ९९७५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन राज्यातील १४ जिल्ह्यांत ३६ केंद्रांवरून खरेदी करणार आहे. तर पणन विभागाची १८३ केंद्रे राहणार आहेत. याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठी संधी देण्यात आली असून, या कंपन्यांमार्फत १३७ ठिकाणी केंद्रे उघडण्याचे नियोजन असल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या नोंदणीचा आढावा घेतला असताना विदर्भ मार्केटिंग फेडरेशनकडे ३८२६९ शेतकरी, पणन विभागाकडे ५३९९९ आणि शेतकरी कंपन्यांच्या केंद्रावर ७४८६ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे.
सध्या बाजारपेठांमध्ये चांगल्या दर्जाची तूर सहा हजारांपेक्षा अधिक दराने विकत आहे. अकोला बाजार समितीत गुरुवारी उत्कृष्ट दर्जाच्या तुरीला ६१०० रुपये, तर सरासरी ५८०० रुपयांचा दर मिळाला. तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. अशा वेळी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर किती माल विक्रीला येईल याबाबत यंत्रणांना शंका आहे. सध्या तूर खरेदीसाठी जे केंद्र सुरू झाले तेथे मोजमापासाठीच तूर आलेली होती. कुठेही गर्दीसारखा प्रकार नसल्याचे सूत्राने सांगितले. सध्या तूर काढणीला वेग येत आहे. पुढील महिन्यात तूर विक्रीसाठी अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार आहे. तेव्हा या खरेदी केंद्रांना अधिक प्रतिसादाची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
- 1 of 1540
- ››