पूर, अतिवृष्टीने दीड लाख हेक्टर पीकहानी : फलोत्पादनमंत्र्यांची माहिती

फलोत्पादन बैठकीतील निर्णय असे शेततळ्यासाठी अर्ज येतील तशी मान्यता द्यावी काही भागासाठी ठिबक अनुदान ८० टक्के मिळणार कोकणात काजू विकासासाठी ठिबक योजना शेततळे असल्यास मागेल त्याला अस्तरीकरण अतिवृष्टीग्रस्त फळबागांसाठी मदत फळबाग लागवडीत आता द्राक्षाचा समावेश
पूर, अतिवृष्टीने दीड लाख हेक्टर पीकहानी : फलोत्पादनमंत्र्यांची माहिती
पूर, अतिवृष्टीने दीड लाख हेक्टर पीकहानी : फलोत्पादनमंत्र्यांची माहिती

पुणे : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टरपर्यंत पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय फलोत्पादन विभागाने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.  कृषी आयुक्तालयात शुक्रवारी (ता. ९) झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे, फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे, आत्माचे संचालक अनिल बनसोडे उपस्थित होते. 

 “उपग्रहाकडून मिळालेल्या अंदाजानुसार एकूण पिकांची आतापर्यंतची हानी दीड लाख हेक्टरपर्यंत दिसते आहे. या प्राथमिक आकडेवारी असून त्यात सुधारणा होऊ शकते. पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र, नुकसानग्रस्त फळबागा उभारण्यासाठी खड्डे खोदाई ते लागवडीसाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. पांडुरंग फुंडकर योजनेतील मर्यादा व निकषांचा आढावा घेऊ,” असे ना. क्षीरसागर म्हणाले.

ठिबक अनुदान ८० टक्के पाण्याचा माफक वापर होण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक उत्पादन योजना राबविली जात आहे. राज्यात आतापर्यंत २४ लाख हेक्टर क्षेत्राला ठिबक अनुदान दिले गेले आहे. आता काही भागासाठी ठिबक अनुदान ८० टक्के दिले जाईल. त्याचा जीआर काढला जाईल. या अनुदानवाढीचा फायदा मराठवाडयातील आत्महत्याग्रस्त जिल्हे, विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील १४ दुष्काळी जिल्ह्यांतील ७७ डीपीएपी (अवर्षणप्रवणग्रस्त) तालुक्यांमधील शेतकऱ्यांना होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

काजू लागवडीला प्रोत्साहन राज्यातील काजू उत्पादनात सातत्याने वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आयातदेखील वाढते आहे. त्यामुळेच मागणीच्या प्रमाणात राज्यातील काजू उत्पादन वाढविण्यासाठी अजून १०० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगून श्री. क्षीरसागर म्हणाले की, काजू उत्पादन विषयक नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. शासनाने या अहवालाचा स्वीकारदेखील केला आहे.

टार्गेट न बघता मंजुरी द्या फलोत्पादन व रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या कामांचा आढावा मी घेतला आहे. उणिवा आणि त्रुटीही जाणून घेतल्या. राज्यात फलोत्पादनाचे कार्यक्रम चांगले राबविले जात असून मागेल त्याला शेततळे योजनेला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, टार्गेटची वाट पाहू नका. मागणी आल्यास त्वरित मंजुरी द्या, अशा सूचना दिल्याचे फलोत्पादनमंत्र्यांनी सांगितले. “कृषी खात्याच्या कामाला गती देण्यासाठी आता उत्पादनच नव्हे तर प्रक्रियादेखील वाढवावी लागेल. फलोत्पादनाच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. तोदेखील टिकवून ठेवावा लागेल,” असे ते म्हणाले. आमची कार्यालये पाण्यात ः दिवसे आयुक्त दिवसे यावेळी म्हणाले की, “पीकहानीच्या बाबतीत ११ जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात ४० हजार हेक्टर क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्याचे असण्याची शक्यता आहे. एकूण हानी दीड लाख हेक्टरच्या आसपास असली तरी निश्चित माहिती अजून हाती आलेली नाही. कारण आमची कार्यालयेदेखील पाण्यात आहेत. दुष्काळ आणि पूर हा निसर्गाचा कोप राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती गंभीर आहे. पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र, मराठवाड्यात अजूनही ६०० टॅंकर चालू असून कृत्रिम पावसाची तयारीदेखील सुरू आहे. उस्मानाबाद, बीड भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. जायकवाडी धरण ६७ टक्के भरले आहे. मात्र, मांजरा व इतर प्रकल्पात पाणी नाही. निसर्गाचा कोप झाल्याने अशी दोन चित्र दिसत आहेत. या दोन्ही स्थितीचा सामना करण्यासाठी शासन पातळीवर तातडीचे उपाय केले जात आहेत, असे ना. क्षीरसागर म्हणाले. मुंडेंच्या उपोषणाची मला माहिती नाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पीकविम्याबाबत केलेल्या उपोषणाबाबत छेडले असता ना. क्षीरसागर म्हणाले की, मुंडेच्या उपोषणाबाबत मला काहीही माहिती नाही. तसेच, पीक क्षेत्रापेक्षा जास्त विमा उतरविला असल्यास तेथे समित्या काम करीत आहेत. या समित्यांचा निर्णय विमा कंपन्यांवरदेखील बंधनकारक राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com