देशात एक लाख खेडी डिजिटल करणार ः राज्यमंत्री संजय धोत्रे

देशात एक लाख खेडी डिजिटल करणार ः राज्यमंत्री संजय धोत्रे
देशात एक लाख खेडी डिजिटल करणार ः राज्यमंत्री संजय धोत्रे

अकोला ः येत्या काळात देशात एक लाख खेडी डिजिटल करण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास, इलेक्ट्राॅनिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. 

केंद्रात राज्यमंत्री बनल्यानंतर खासदार धोत्रे पहिल्यांदा बुधवारी (ता. ५) अकोल्यात आले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी भाजपचे सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे उपस्थित होते. 

श्री. धोत्रे म्हणाले, ‘‘देशातील जनतेने भाजपला सर्वत्र भरभरून मतदान केले. प्रामुख्याने पश्चिम बंगाल सारख्या राज्यात मारलेली मुसंडी हे मोठे यश आहे. या सरकारने गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी योजना राबविल्याने जनतेनेही साथ दिली. या सरकारच्या कार्यकाळात विकासाची ही गाडी आणखी वेगाने धावणार आहे. गेल्या कार्यकाळात देशात एक लाखावर खेडी डिजिटल बनविण्यात आली. आता याही वेळी एक लाख खेडी डिजिटल बनवून सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुकर बनविण्याचा निश्चय मोदी सरकारने केला आहे.’’ 

‘‘या सरकारने सुरवातीपासूनच सर्वसामान्य माणसाच्या विकासाचे ध्येय ठेवीत त्यादृष्टीने योजना राबविल्या. यात १२ रुपयांत विमा, प्रधानमंत्री पीकविमा, जनधन खाते उघडणे असेल, अशा असंख्य योजनांमुळे विकास अधिक गतीने होऊ लागला. आता खेड्यांचेही चित्र बदलण्याचा प्रयत्न होत आहे. ठिकठिकाणी शाळा डिजिटल करून त्याद्वारे उत्तम शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. खेडी डिजिटल बनली तर येथील माणसाला गावातच सुविधा भेटू शकतील, त्यासाठी एक लाख खेडी डिजिटल बनविण्याचे काम आगामी काळात केले जाणार आहे. केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने आता राज्य तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना, प्रकल्प आणण्याचा प्रयत्न राहील,’’ असेही श्री. धोत्रे यांनी सांगितले.   

‘एमसीएआर’चे उपाध्यक्षपद सोडले गेल्या काळात खासदार संजय धोत्रे यांनी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. मंत्री दर्जाचे हे पद त्यांनी मागील काही महिने सांभाळले. आता केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे.  त्यामुळे उपाध्यक्षपदाचे काय, असा प्रश्न विचारला असता धोत्रे यांनी आपण हे पद सोडल्याचे ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com