कांदा आवक रोडावलेलीच; शेतकऱ्यांचा रोष कायम

आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभागी होण्याचे ठरविले आहे. काही ठिकाणी आवक होत आहे. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी आहेत, ते माल विकत आहेत. आम्ही त्यांची अडवणूक करणार नाही. - देवीदास पवार, प्रदेश उपाध्यक्ष, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंध लादल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कांदापुरवठा रोखून धरल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांत सलग तिसऱ्या दिवशीही आवक प्रचंड रोडावली आहे. 

जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारच्या निर्बंधांना विरोध दर्शविला होता, तसेच जोपर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही, कांदा बाजारात आणू नका, असे आवाहनही शेतकऱ्यांस केले. यास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महत्त्वाच्या बाजार समित्यांत जवळपास ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कांदा आवक रोडावल्याचे चित्र बुधवारी (ता. ९) कायम होते.  नाशिक जिल्हाभर कांदा उत्पादकांचा 'असहकार' सुरूच असल्याचे समोर आले आहे. शेतकरी संघटनांनी प्रत्यक्ष कामकाजात हस्तक्षेप न करता कांदा बाजारात आणू नये यासाठी भेटीगाठी घेत बंदची हाक दिली.

तसेच व्यापाऱ्यांनाही लिलाव बंद ठेवण्याचे आवाहन केले; मात्र बाजार समित्यांनी कामकाज सुरू ठेवण्याची घेतलेली भूमिका घेतल्याने कारवाईच्या धाकाने व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू आहेत. मात्र त्याची टक्केवारी लासलगाव व पिंपळगाव बसवंत या प्रमुख बाजार समित्यांत घटल्याचे सोमवारी (ता. ७) स्पष्ट झाले. दसऱ्यानंतर पुन्हा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद बुधवारी (ता. ९)ही कायम होते. जिल्ह्यातील उमराणे, नामपूर, कळवण, सटाणा या बाजार समित्या तांत्रिक कारणांमुळे बंद होत्या. दसऱ्यानंतर येथे कांद्याची आवक वाढेल अशी अपेक्षा असताना येथेही आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. 

जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांचे कामकाज सुरू सुरळीतपणे चालू असले तरी, आवकेत घट दिसून आहे. लासलगाव येथे काही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असल्याची, माहिती लासलगाव बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शेतकरी संघटनांच्या वतीने कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव करू नयेत व बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवावे या आशयाचे निवेदन बाजार समित्यांना शेतकरी संघटनांच्या वतीने देण्यात आले होते. मात्र ज्या शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी आणला आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्ह्यातील बाजार समित्यांनी घेतलेला आहे. मात्र कांदा लिलाव बंदबाबत निवेदन प्राप्त नसल्याचे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू राहील, असे सभापती राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

नामपूर बाजार समितीचे कामकाज सुरू होते. मात्र कांद्याची आवक ६० ते ७० टक्क्यांनी येथेही घटली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. कळवण बाजार समितीच्या मुख्य आवारातील कामकाज बंद होते, मात्र या बाजार समितीच्या उपबाजार असलेल्या अभोणा व कणाशी बाजार समित्यांचे कामकाज सुरू होते. मात्र आवकसुद्धा ७० टक्क्यांनी घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

‘सरकारने अजूनही फेरविचार करावा’ पुकारलेल्या कांदा लिलाव बंदच्या पार्श्वभूमीवर कुठेही काहीच गैरप्रकार घडला नाही, मात्र बाजार समित्या, व्यापारी व प्रशासनाने धसका घेतला असल्याचे दिसून आले. सरकारने निर्णय घेऊन नेमका कुणाचा फायदा झाला हे सांगावे. म्हणून या निर्णयाबाबत अजूनही सरकारने गांभीर्याने विचार करावा; नाहीतर परिणामाला सामोरे जावे लागेल, अशा स्वरूपाचा इशारा शेतकरी संघटनांचा कायम आहे.   

आम्ही कांदा आंदोलनाची हाक दिली असली, तरी बाजार समित्यांच्या कामकाजात अडचण येईल असे काहीच न करणार नाही. शेतकऱ्यांची भूमिका ठरलेली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे कांदा लिलाव बंद आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. त्याचा धसका व्यापाऱ्यांनी घेतल्याने बाजारभावात वाढ होऊन ते स्थिर आहेत.  - संतू पाटील झांबरे, ज्येष्ठ नेते, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना  

कांदा स्थिती
बाजार समिती  सर्वसाधारण होणारी आवक (क्वि.)   बुधवारी (ता.९) झालेली आवक  मिळालेला सर्वसाधारण दर (क्विं.)
लासलगाव  १५०००  ३८९३  ३५५१ 
पिंपळगाव बसवंत १६००० ७१५० ३४७५
नामपूर १४००० ६५००   ३४५०
कळवण १२००० ३९००  ३४०० (माहिती स्त्रोत ः बाजार समिती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com