चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरू

अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद राहिले. जुने व नवे व्यापारी यांच्यात कांदा खरेदीवरून वाद असल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या बाजार समितीत कांदा विक्रीसाठी नेण्याची वेळ आली होती.
Onion auction begins in Chandwad
Onion auction begins in Chandwad

नाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद राहिले. जुने व नवे व्यापारी यांच्यात कांदा खरेदीवरून वाद असल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या बाजार समितीत कांदा विक्रीसाठी नेण्याची वेळ आली होती. त्यामुळे आर्थिक फटका व मनस्ताप सहन करावा लागला. अखेर मंगळवारी (ता. १८) जुन्या नव्या कांदा व्यापाऱ्यांमध्ये निर्णय झाल्यानंतर लिलाव सुरू झाले आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  

सोमवारी (ता. १७) बाजार समितीत जुने व नवे व्यापारी यांसह बाजार समिती व्यवस्थापन बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जुने व्यापारी चालू आर्थिक वर्षात नफा तोटा भरून काढण्यासाठी मार्चअखेर कामकाज करतील तर नवे व्यापारी नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून खरेदीस उतरणार आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली.

यापूर्वी जुने व नवे व्यापारी यांच्यात खरेदीवरून हा वाद टोकाचा झाला असताना एकीकडे बाजार समिती व्यवस्थापनाने लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे तीन दिवसांसाठी परवाना निलंबित केले होते. ते मागे घेण्यात आले आहे. मात्र कामकाज बंद राहिल्याने शेतकऱ्यांना मनमाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे येथे कांदा घेऊन जाण्याची वेळ आली होती. 

९०० वाहनांची आवक  बाजार समितीचे लिलाव सुरू झाल्यानंतर बाजार समिती आवारात ९०० वाहनांची आवक झाली. लिलाव सुरू झाल्यानंतर पाहिल्या सत्रात लाल कांद्याला किमान १५०० ते कमाल २४७०, तर सरासरी २०५० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चांदवड बाजार समितीमध्ये झालेल्या नव्या आणि जुन्या व्यापाऱ्यांचे वादामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कळत-नकळत नुकसान झालेले आहे. बाजार समितीचे कामकाज बंद असल्यामुळे इतर बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याने कांद्याचे दर पडले होते. साधारण एका ट्रॅक्टरमागे शेतकऱ्याला ४ ते ५ हजारांचा फटका अप्रत्यक्षरीत्या बसलेला आहे. - कैलास जाधव, तालुकाध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

शेतकऱ्यांची गैरसोय नको ही आमची भूमिका आहे. यावर जुने व नवे व्यापारी यांच्या बैठकीत निर्णय घेऊन कामकाज सुरू केले आहे. - डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com