कांदा लिलाव अखेर सुरू

जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू करण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर शुक्रवारी (ता.३०) जिल्ह्यात पुन्हा कांदा लिलाव सुरू झाले.
onion
onion

नाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू करण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर शुक्रवारी (ता.३०) जिल्ह्यात पुन्हा कांदा लिलाव सुरू झाले. तर, काहींनी ईदचे कारण देत लिलाव बंदच ठेवले. मात्र सणासुदीच्या तोंडावर काही बाजार समित्या चालू होत्या तर काही बंद का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे व्यापारी व बाजार समित्यांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जातोय. अगोदरच जिल्ह्यात सलग चार दिवस कांदा लिलाव बंद होते. ही कोंडी सोडविण्यासाठी नाशिक दौऱ्यावर असलेले खासदार शरद पवार यांनी कांदा उत्पादक व व्यापारी यांची बाजू समजून घेत लिलाव तातडीने सुरू करण्याचे आवाहन केले. तरीही यावर व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी बंदची भूमिका घेतली. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.२९)जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांची अडचण समजून घेण्यासाठी होणारी बैठकही रद्द झाली. अन् ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईला झाली. यावेळी चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी कामकाज सुरू करण्याची भूमिका दाखविली. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेऊन बाजार समित्यांचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. तरीही ईदचे कारण पुढे करत कामकाज बंद ठेवले. त्यामुळे शेतकरी अजूनही संभ्रमात आहेत. आता मात्र सोमवारी आवक वाढण्याची शक्यता आहे.

खुलाशामुळे बाजार समित्या, व्यापाऱ्यांची दुटप्पी भूमिका उघड  काही बाजार समित्यांनीच कामकाज बंद राहील, असे संदेश फिरवल्याचे पुरावे प्रहार संघटनेने सादर केले. काही व्यापाऱ्यांनी कामकाज बंद ठेवण्याबाबतचे अर्ज सादर केले होते, मात्र, व्यापारी प्रतिनिधी अर्ज दिलेच नसल्याचे जाहीरपणे सांगत होते. आता याचा खुलासा झाल्याने व्यापाऱ्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे समोर आले आहे.

‘साठा मर्यादावाढीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करू’ महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता.२९)  मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन अडचणी मांडल्या. या वेळी ``राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असून आपण त्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. शासन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. कांदा साठवणुकीसंदर्भात निर्बंधाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून ही मर्यादा वाढवून घेण्याचा राज्य शासन प्रयत्न करील. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरु करावेत,`` असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

प्रतिक्रिया जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला बाजार समित्या जुमानत नाहीत, हे बाजार समित्या बंद राहिल्यामुळे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत अरेरावी करणाऱ्या बाजार समित्या व्यापाऱ्यांच्या बेकायदेशीर बंदला कसे खतपाणी घालतात, याचे उत्तर द्यावे लागेल. आता बाजार समित्यांवर कारवाई केली पाहिजे. - गणेश निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख, प्रहार शेतकरी संघटना

ईदमुळे बाजार समित्या बंद आहेत. नंतर नियमित बाजार समित्या सुरू होतील. त्यामुळे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. - सतिष खरे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक

बाजार समित्यांमधील स्थिती

बाजार समिती  आवक किमान  कमाल  सरासरी
पिंपळगाव बसवंत  ३५६०   २५००     ७१४०    ५८००
लासलगाव   २५००   १५००  ५९१२  ५३००
मनमाड  ६०० १५००   ५३१०  ४९००
नांदगाव १५००   १५००   ५०११  ४५००
येवला  १५०० १५०० ६४०१  ५३००
सिन्नर १०००    १०००   ५५२६   ५०००
कळवण  ३२००  २०००   ६५००     ५५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com