भारतीय सीमांवरून कांद्याचे ट्रक माघारी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : निर्यातबंदीपूर्वी पाठवण्यात आलेले कांद्याचे ट्रक भारतीय सीमांवरून माघारी येत आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीतील व्यवहार अडचणीत अाले असून, कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता निर्यातदार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांकडे साठवलेला कांदा संपुष्टात येत असल्याने तसेच मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने दरात सुधारणा झाली होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक कांदा व्यापाऱ्यांना बाहेरील देशांना व्यवहाराप्रमाणे कांदा पाठवता येत नसल्याचे चित्र आहे. कांदा निर्यातबंदीपूर्वी नेपाळ, बांगलादेश सीमेवर गेलेले कांद्याचे ट्रक माघारी पाठविण्यात आले असल्याची माहिती नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी दिली. मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याची दरवाढ होत आहे, असे कारण देत वाणिज्य मंत्रालयाने निर्यातबंदीचे पाऊल उचलले आहे.  

हे जरी खरे असले तरी, रविवारपूर्वी अनेक कांदा निर्यातदारांनी शेजारील देशांकडून आगाऊ ऑर्डर घेतल्या होत्या. त्या रविवारी सीमेवर पोचल्या होत्या. मात्र निर्यातबंदीच्या निर्णयामुळे सीमेच्या पुढे कांदा पाठविण्यास सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे सीमेवर येऊनही कांदा देशाबाहेर जाऊ शकला नसल्याने मोठे नुकसान होत आहे. याचा फटका कांदा व्यापाऱ्यांना बसला आहे. अनेक कांदा व्यापाऱ्यांनी आगाऊ रक्कम घेऊन संबंधितांना कांदा पाठवला होता. मात्र तो जाऊ न शकल्याने व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. समोरील आयातदाराला पैसे परत देताना कांदा भावाच्या घसरणीमुळे परत पैसे कसे द्यायचे या चिंतेत व्यापारी आहेत. स्टॉक लिमिट काढावी, आयातदारांनी नोंदवलेली २९ तारखेपूर्वीची ऑर्डर पूर्ण करू द्यावी. लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापारी करत आहेत. 

कांद्याचे ट्रक थांबून मेहंदीपूर, भोजा दंगा, हिली बनगाव या सीमांवर ३०० कांद्याचे ट्रक थांबून होते. नेपाळ सीमेवर सिनौली व दुसऱ्या सीमेवर ५० ट्रक होते. मुंबईमध्ये १०० ट्रक थांबून असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका कांदा निर्यातीच्या निर्णयामुळे बसणार आहे.   व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव खुल्या पद्धतीने होतो, त्यामुळे माळ घेतल्यानंतर ती पुढे पाठविताना २ ते ७ दिवस लागतात. कांदा व्यापाऱ्यांना ५०० क्विंटल साठवणुकीची मर्यादा असल्याने खरेदी थांबत आहे. त्या दृष्टीने कांदा खरेदी केल्यानंतर त्याची पुढील विल्हेवाट करण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी मिळावा. आम्ही दैनंदिन बाजार समितीच्या माध्यमातून आवक, खरेदी व विक्री रिपोर्ट सादर करत आहोत. त्यामुळे मागणी लक्षात घेता कांदा लोडिंगसाठी अधिक वेळ द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com