गारपिटीच्या दाहकतेनेचूलच पेटली नाही

शनिवारपासून (ता. २०) सलग चार दिवस सटाणा तालुक्याच्या अनेक भागांत हलकी गारपीट झाल्या. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये धडकीच भरली.
onion damage
onion damage

नाशिक : शनिवारपासून (ता. २०) सलग चार दिवस सटाणा तालुक्याच्या अनेक भागांत हलकी गारपीट झाल्या. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये धडकीच भरली. त्यात तळवाडे दिगर येथे सलग चार दिवस गारपीट झाली तर केरसाने येथे मंगळवारी (ता.२३) एकच दिवस झालेल्या गारपिटीने मोठा दणका दिला. अख्ख्या गावात होत्याच नव्हतं झालं. अगोदरच संकटांची मालिका आणि त्यातच आभाळ फाटलं. त्या दिवशी अनेकांच्या घरात चूलच पेटली नव्हती. या स्थितीत पुन्हा उभं राहायचं कसं अन् जगायचं कसं, अशी अशी हतबलता शेतकरी व्यक्त करत आहेत. सटाणा तालुक्यातील १० हजार शेतकऱ्यांवर संकट कोसळले. ऐतिहासिक साल्हेर मुल्हेर किल्ल्याच्या डोंगररांगेतील कान्हेरी नदीच्या तीरावर असलेल्या केरसाने गावावर अवकाळीचं संकट मात्र मोठं आहे. आभाळ कोसळावे अशी स्थिती झाली. उन्हाळ कांद्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासह अधिक उत्पादकता घेण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा असते. मात्र गारपिटीने ही स्पर्धाच रोखली आहे. येथे झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या कष्टाचा गोड घास हिसकावून घेतला. अनेक शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत हाती भांडवल नसताना लागवडी केल्या. कांद्याच्या लागवडी कंबरेला लागत होत्या. पीक आठ दिवसांनी हाती येईल अशी आशा होती. अनेकांनी कांदा काढणीचे शेतमजुरांशी सौदे देखील केले. मात्र काढणी अगोदरच हे शेती वैभव मातीमोल झालं आहे. गारांचा मार बसल्याने कांद्याची पात तुटून पडली तर खालील कंद्याला मार बसला. त्यामुळे या शेतांमधून उग्र वास यायला सुरुवात झाली आहे. केरसानेसह तळवाडे दिगर परिसरात अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या ५० वर्षांत अशी गारपीट कधीच झाली नाही, असे येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात. परिस्थिती इतकी भीषण होती, की गारपिटीच्या सलग दुसऱ्या दिवशी गारांचा खच पाहायला मिळाला. या संकटात येथील शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. २३) अनेक घरांत सायंकाळी चूलही पेटली नव्हती. गावात सर्वदूर कोणाचेही पीक वाचलेले नाही. वर्षभरापासून कोरोनाचा सामना करून अडचणींवर मात करून शेतकरी उभा राहिला. शेतात पिके उभी केली. मात्र डोळ्यासमोर उभी काढणीयोग्य सर्व पिके नष्ट झाली, या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.  या गावांनाही बसला अवकाळीचा फटका किकवारी, विरगाव, जायखेडा, ब्राह्मणपाडे, गोराणे, सोमपूर, आखतवाडे, वागळे, उत्राने, श्रीपुरवडे, वडे खुर्द, एकलहरे, वाडी पिसोळ, लादूड, बिजोटे, जयपूर, अंतापूर, ताहाराबद, साल्हेर, मुल्हेर, रावेर, कठगड, तांदूळवाडी   असा बसला फटका

  • गारपिटीने कांद्याची पात तुटून पडली 
  • कांद्याला मार लागल्याने सड होण्यास सुरुवात
  • टोमॅटो फळे बाधित, झाडे तुटण्यासह फुलगळ
  • काकडी, गिलके, टरबूज, डांगर आदी पिकांच्या वेली तुटून फळांना मार
  • कांदा बीजोत्पादन क्षेत्रात डेंगळे तुटून पडली
  • प्रतिक्रिया सलग अर्धा तास गारपीट झाली. गावाच काश्मीर झालं होतं. अगोदर महागडी बियाणे घेऊन लागवड केली. हातात भांडवल राहिलं नाही. अशीच परिस्थिती राहिली तर जगायचं कसं. कृषिमंत्र्यांनी दखल घेऊन मदत केली पाहिजे.  - लक्ष्मण आनंदा अहिरे, माजी सरपंच, केरसाने, ता. सटाणा

    कांदा काढणीचे सौदे दिले होते. काढणीस आलेल्या कांद्यात गारांचा थर लागला होता. त्यामुळे कांदा वाचणार नाही. अन् काढला तरी टिकणार नाही. एकीकडे अस्मानी संकट असताना वीज खंडित करण्याचा सुलतानी डाव सुरू आहे. -विश्‍वास मोरे, कांदा उत्पादक, केरसाने, ता. सटाणा

    लाखो रुपये खर्च करून पोटच्या पोरागत जीव ओतून उभं केलेले कांदा व भाजीपाला पिके क्षणातच होत्याची नव्हती झाली. तोंडाशी आलेला घास क्षणात हिरावून घेतला. -आनंदा भामरे, कांदा उत्पादक, तळवाडे दिगर, ता. सटाणा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com