खानदेशात कांदा लागवडीला वेग

खानदेशात कांदा लागवडीला वेग
खानदेशात कांदा लागवडीला वेग

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा लागवडीला वेग आला आहे. कांदा लागवडीची मजुरी यंदा महागली असून, एकरी सात हजार रुपयांपर्यंतचा खर्च येत आहे.  कांदा लागवड यंदा वाढेल, असा अंदाज असून, कांद्याचे दर टिकून असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. लागवड मागील महिन्यात सुरू झाली आहे. ही लागवड आणखी महिनाभर सुरू राहील. कांदा लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या होत्या. तर काही शेतकऱ्यांनी कांदा रोपे खरेदी करून लागवड करणे पसंत केले आहे. रोपवाटिकांचे दरही यंदा अधिक असून, एका अडीच फूट बाय ३० फुटाच्या वाफ्यातील रोपांचे दर तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. एका वाफ्यात अर्धा एकरात कांदा लागवड करणे शक्‍य होत आहे. कांदा लागवड सुमारे सहा ते सात हजार हेक्‍टरवर होईल, असा अंदाज आहे. सर्वाधिक लागवड धुळे तालुक्‍यात होईल. यापाठोपाठ धुळ्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा, जळगाव या भागातही कांदा लागवड बऱ्यापैकी होईल, असा अंदाज आहे. यंदा जलसाठे मुबलक असल्याने लागवड अधिक होईल. आत्तापर्यंत सुमारे दोन हजार हेक्‍टरवर खानदेशात कांदा लागवड झाल्याचा अंदाज आहे.  लागवडीसाठी विविध गावांमध्ये महिला मजुरांचे गट असून, या मजुरांकरवी लागवड शेतकरी उरकून घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये महिला मजुरांचे गट असून, त्यांची मदत शेतकरी लागवडीसाठी घेतात. एकरी सात हजार रुपये लागवडीनंतर लागलीच दिले जातात. तसेच त्यांना शेतापर्यंत आणण्यासाठीचा वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना द्यावा लागतो, असे सांगण्यात आले.  कांदा बिजोत्पादनही जळगाव, धुळे जिल्ह्यात अधिकचे होणार असून, त्यासंबंधीची कांदा लागवड जवळपास पूर्ण झाली आहे. अनेक बिजोत्पादक कंपन्यांनी करार पद्धतीने ही कांदा लागवड विविध भागात केली आहे, अशी माहिती  मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com